पॅरोल मोडणाऱ्या पल्लवीच्या मारेकऱ्याला आणखी एक वर्षाचा तुरुंगवास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/pallavi-purkaystha.jpg)
वकील पल्लवी पूरकायस्थचा मारेकरी सज्जाद मुघलला पॅरोल नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने आणखी एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मुंबईत वडाळा येथील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या पल्लवी पूरकायस्थची सन २०१२ मध्ये सज्जाद मुघलने हत्या केली होती. आई आजारी असल्यामुळे २०१६ साली सज्जादची ३० दिवसांच्या पॅरोलवर सुटका करण्यात आली होती.
मार्च अखेरीस त्याने पुन्हा तुरुंगात परतणे अपेक्षित होते. पण तो फरार झाला. सज्जाद मुघल मूळचा काश्मिरी आहे. सज्जाद पकडण्यासाठी पोलीस अधिकारी संजय निकम यांना दोन महिने काश्मीरमध्ये तळ ठोकावा लागला. त्यानंतर सापळा रचून पुन्हा सज्जाद मुघलला अटक करण्यात आली. मुंबईतील हे अत्यंत संवेदनशील प्रकरण होते.
सज्जाद पॅरोलचे उल्लंघन करुन फरार झाल्यामुळे त्यावेळी तुरुंग अधीक्षकांना निलंबित करण्यात आले होते तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुद्धा करण्यात आली होती. वडाळयातील हिमालयीन हाईटस या टॉवरमध्ये पल्लवी आपल्या मित्रासमवेत भाडयाच्या घरात राहत होती. सज्जाद त्याच टॉवरमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करायचा.
त्याची पल्लवीवर वाईट नजर होती. जेव्हा हा सर्व प्रकार तिच्या लक्षात आला तेव्हा तिने सज्जादला विरोध केला. त्याचा रागातून त्याने ९ ऑगस्ट २०१२ रोजी घरात कोणी नसताना पल्लवीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली होती. न्यायालयात हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर सज्जादला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. पॅरोल उल्लंघनाच्या घटनेमुळे राज्य सरकारने कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्ती केली. यापुढे गंभीर गुन्ह्यातील दोषीने पॅरोलसाठी अर्ज केला तर पॅरोल मंजूर करण्याआधी तुरुंग प्रशासनाला संबंधित तपाय यंत्रणेकडून परवानगी घेणे अनिवार्य आहे.