Breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पूर ओसरल्यानंतर रोगराईचा धोका

आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहन

शहरात गेल्या आठवडय़ात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पावसाने सलग विश्रांती घेतल्याने पुराचे पाणी ओसरले आहे, मात्र पुराचा फटका बसलेल्या परिसरात रोगराईचे संकट आ वासून समोर उभे आहे. या पाश्र्वभूमीवर दूषित पाण्यामुळे पसरणारे पोटाचे आजार आणि डासांमुळे पसरणारा डेंग्यू, मलेरिया यांच्यापासून खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

शहरातील सिंहगड रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, धनकवडी, सहकारनगर, कोंढवा या परिसरांमध्ये आंबील ओढा दुर्घटनेमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. पाण्याबरोबर वाहून आलेला चिखल, गाळ, ठिकठिकाणी साचून राहिलेले पाणी यामुळे रोगराईच्या प्रसाराला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शुद्ध आणि स्वच्छ पाणी पिणे, सुरक्षित अन्नपदार्थाचे सेवन करणे आणि परिसराची स्वच्छता लवकरात लवकर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, पुराचा फटका बसलेल्या भागांमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बरोबरीने समांतर आरोग्य सेवा यंत्रणा उभी करण्यात आली. पूर आलेल्या भागांमध्ये तातडीने स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे, औषधांचा साठा करणे आणि रुग्णवाहिका सेवा तैनात करणे असे प्रयत्न करण्यात आले. मात्र, पूर ओसरल्यानंतरची रोगराई नियंत्रणात ठेवणे हे आरोग्य विभागापुढचे प्रमुख आव्हान आहे. त्यादृष्टीने औषध फवारणी, परिसराची स्वच्छता या गोष्टी करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांचे वैयक्तिक पातळीवरील प्रयत्न या काळात सर्वात महत्त्वाचे ठरणार आहेत.  घरातील पाणीपुरवठा नियमित सुरू झाल्यानंतर उकळून थंड केलेले पाणी पिणे, घराच्या परिसरात पाण्याची डबकी साठून राहणार नाहीत याची काळजी घेणे, डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होऊ नयेत याकडे लक्ष पुरवणे महत्त्वाचे ठरेल. लेप्टोस्पायरोसिसचा पुणे शहरातील पूर परिस्थितीत फारसा धोका नाही, मात्र मलेरिया, टायफॉईड, कॉलरा, डेंग्यूपासून खबरदारी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, गेल्या आठवडय़ापर्यंत सतत सुरू असलेल्या पावसामुळे पोटाचे विकार, सर्दी-खोकला, अंगदुखी यांसारख्या लक्षणांनी ग्रासलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरातील डेंग्यूचे प्रमाणदेखील बरेच वाढले आहे. त्या पाश्र्वभूमीवर पूर ओसरल्यानंतर रोगराईचा धोका आहे. ताप, अंगदुखी, सर्दी-खोकला किंवा उलटय़ा, जुलाब, अतिसार यांपैकी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे आणि संपूर्ण विश्रांती घेणे ही प्रमुख काळजी रुग्णांनी घ्यावी. बाहेरचे, उघडय़ावरचे पदार्थ खाल्ले जाणार नाहीत याबाबत कटाक्ष ठेवावा. घराच्या परिसरात डासांची वाढ होऊ नये यासाठी स्वच्छता राखण्यास प्राधान्य द्यावे.

  • काय खबरदारी घ्याल?
  • परिसराची स्वच्छता राखा
  • दहा मिनिटे उकळवून, थंड केलेले पाणी प्या
  • उघडय़ावरचे, बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नका
  • ताप, सर्दी, खोकला यांपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास संपूर्ण विश्रांती घ्या
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका
  • डासांची पैदास रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रीय कार्यालयांशी संपर्क साधून औषधफवारणी करून घ्या
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button