पुणे विद्यापीठाने भारतीय इतिहास काँग्रेसचे अधिवेशन पुढे ढकलले
७९वे इंडियन हिस्टरी काँग्रेसचे अधिवेशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुढे ढकलण्यात आले आहे. निधीची कमतरता तसेच बालेवाडी येथे खेलो इंडियाच्या कार्यक्रमामुळे अधिवेशनाला येणाऱ्या १ हजार लोकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही, त्यामुळे हे अधिवेशन नाईलाजास्तव पुढे ढकलण्यात येत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून आज (गुरुवारी) अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. इंडियन हिस्टरी काँग्रेसचे यंदाचे अधिवेशन २८ ते ३० डिसेंबर रोजी हे अधिवेशन होणार होते.
या अधिवेशनासाठी दीड कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आत्तापर्यंत हा निधी उपलब्ध झालेला नाही, त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजनाचे आम्ही कुठलेही वचन देऊ शकत नाही, पण निधी उपलब्ध होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता हे अधिवेशन पुढील वर्षी फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरवातीला अधिवेशन व्हावे, असे पत्र इतिहास विभागाकडून विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आल्याचे विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. राधिका सेशन यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे विद्यापीठाच्या या निर्णयावर इतिहास संशोधकांनी नाराजी व्यक्त करीत विद्यापीठावर टीका केली आहे. इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या सचिव प्रा. महालक्ष्मी रामकृष्णन यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, विद्यापीठाचा हा निर्णय अतिशय धक्कादायक आणि अत्यंत निराशाजनक आहे. इतिहासतज्ज्ञ प्रा. एस. इरफान हबीब यांनी देखील विद्यापीठाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.
इंडियन हिस्ट्री कॉंग्रेस ही भारतीय इतिहास तज्ज्ञांची एक मोठी व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेद्वारे भारतीय इतिहास संशोधन आणि प्रचारासाठी प्रोत्साहन दिले जाते.