पुणे – पीएमपीच्या 50 बसेसचे “फायर सेफ्टी ऑडिट’
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) बसेसना गेल्या काही महिन्यांत आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बसेसचे “फायर सेफ्टी ऑडिट’ करण्याचे ठरवले होते. यासाठी प्रायोगिक तत्वावर “क्राफ्ट’ या संस्थेची निवड करण्यात आली. या कंपनीने पिंपरी डेपोतील बसेसचे फायर सेफ्टी ऑडिट सुरू केले असून 50 बसेसचे काम पूर्ण झाले आहे.
गेल्या आठ महिन्यांत जवळपास नऊ पीएमपी बसेसनी डेपो तसेच मार्गावर पेट घेतला होता. यामुळे बसेसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यातून बसेसचे “फायर सेफ्टी ऑडिट’ पूर्ण आहे, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. बसेस पेटण्याचे नेमके कारण काय, यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली. या समितीने सर्व बसेसचे “फायर सेफ्टी ऑडिट’ करण्याचे सूचविले होते. तर, हे ऑडिट महापालिकेने करण्याची मागणी पीएमपी प्रशासनाने केली होती. त्यावर महापालिकेने फायर ऑडिट करणाऱ्या काही संस्थांची यादी पीएमपीला दिली. यामधील एका संस्थेने पुढाकार घेत कशा प्रकारे फायर ऑडिट केले जाईल, याचे प्रात्यक्षिक पीएमपी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालिक नयना गुंडे यांना दाखविले. त्यानुसार या संस्थेला सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर पिंपरी डेपोचे काम देण्यात आले असून हे काम पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.