पीएमपीच्या 83 बसेस नव्या रुपात
पुणे – पीएमपीच्या जवळपास शंभर बसेसचे इंजिन चांगल्या स्थितीत असून केवळ खराब सांगाडा, तुटलेल्या काचा, खिडक्या आणि जिर्ण झालेल्या पत्र्यामुळे त्या वापराविना पडून होत्या. तत्कालिन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी या बसेसची दुरुस्ती करण्यासाठी त्या निगडी येथील वर्कशॉपमध्ये पाठवल्या होत्या. आजघडीला यापैकी 83 बसेसचे सर्व काम पूर्ण करण्यात आले असून त्या नव्या रुपात पुन्हा पीएमपी ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत; तर उर्वरीत 17 बसेस येत्या पंधरा दिवसांत दाखल होणार असल्याचे पीएमपीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात 2 हजार 33 बसेस आहेत. यापैकी जवळपास दोनशे बसेस या आयुर्मान संपलेल्या आहेत; तर काही बसेस जुन्या झाल्या आहेत. अशाच स्वरुपाच्या ताफ्यात शंभर बसेस होत्या. या बसेसचे इंजिन उत्तम असून केवळ वरील सांगाडा खराब झाल्याने त्या वापराविना पडून होत्या. मुंढे यांनी त्या दुरुस्त करून पुन्हा वापरात आणण्याचे ठरवले होते. त्यानुसार निगडी येथील वर्कशॉपमध्ये त्या दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यामध्ये बसेसचे जिर्ण झालेले पत्रे बदलणे, काचा, खिडक्या बसवून त्या दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. अशाप्रकारे एकुण 100 पैकी 83 बसेस दुरुस्त करून त्या पुन्हा वापरात आणल्या असल्याचे पीएमपीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. तर उर्वरीत 17 बसेसचे काम सुरू असून येत्या पंधरा दिवसांत त्या वापरात येणार असल्याचेही सांगण्यात आले.