पालिका कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Ajoy-Mehta.jpg)
आयुक्त अजोय मेहता यांचे आश्वासन
पालिका कर्मचाऱ्यांना लवकरच सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचे आश्वासन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापौर निवासस्थानी रविवारी झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीला दिले. या संदर्भात मंगळवारी पालिका आयुक्तांच्या दालनात कामगार संघटनांची बैठक होणार असून या बैठकीत कामगार संघटनांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
पालिका कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांबाबत महापौर निवासस्थानी रविवारी अजोय मेहता आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार संघटनांची बैठक पार पडली. सातवा वेतन आयोग आणि सहाव्या वेतन आयोगाच्या त्रुटींबाबत चर्चा करून तो तात्काळ लागू करावा, ३६ महिन्यांच्या थकबाकीपोटी अंतरिम वेतन वाढ द्यावी, वैद्यकीय गटविमा योजना लागू करावी आदी विविध मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. उद्धव ठाकरे यांनी या मागण्यांबाबत अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी या वेळी दिले. या बैठकीस समन्वय समितीचे पदाधिकारी अॅड. प्रकाश देवदास, बाबा कदम, अॅड. महाबळ शेट्टी, दिवाकर दळवी, के. पी. नाईक, सुखदेव काशीद आदी उपस्थित होते.
राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे पालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा लागेल. त्याबाबत मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे अजोय मेहता यांनी स्पष्ट केले.