breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पाण्याच्या टँकरना ‘जीपीएस’

पनवेल महापालिकेचे टँकर धोरण जाहीर; टँकरमाफियांच्या मक्तेदारीला चाप

पनवेलमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा गैरफायदा घेऊन अवाजवी दरात पाण्याचे टँकर पुरवणाऱ्या माफियांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी पनवेल महापालिकेने नवीन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार टँकरचे दर निश्चित करण्यात आले असून टँकरमधील पाण्याच्या स्रोताची माहितीही पालिकेला आधी द्यावी लागणार आहे. टँकरचालकांवर नजर ठेवण्यासाठी या वाहनांना ‘जीपीएस प्रणाली’ बसवण्यात येणार आहे.

पनवेल महापालिकेच्या हद्दीत पालिकेमार्फत दररोज २०० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. पालिका हद्दीत समाविष्ट असलेली २९ गावे आणि जुन्या पनवेलच्या काही भागांत हा पाणीपुरवठा केला जातो. याखेरीज खासगी टँकरद्वारेही पाण्याची विक्री केली जाते.

मात्र, पालिकेच्या टँकरद्वारे पाणीवितरणामध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास येत आहे. लोकसभा विधानसभा निवडणुका जवळ आल्याने नगरसेवक आपल्या पक्षांसाठी कामाला लागले आहेत. त्यामुळे मागेल त्या सोसायटीला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एकाच सोसायटीत दिवसाला चार चार टँकर पाठविले जात आहेत तर त्या समोरच्या सोसाटीला एकही टँकर मिळत नाही असे चित्र आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकामध्ये शिमगा सुरू झाला आहे. त्यावर उपाय म्हणून पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी टँकर धोरण आखले आहे. त्यानुसार पालिकेच्या खात्यातून टँकर मागवून आपल्या आवडत्या सोसायटय़ांची तहान भागवण्याचे नगरसेवकांचे प्रयत्न बंद होणार आहेत. नव्या धोरणानुसार यासाठी या नगरसेवकांना आपल्या खिशातून पैसे मोजावे लागतील.  त्याच प्रमाणे पालिकेने भाडय़ाने घेतलेले टँकरवर पालिका सेवार्थ असे स्पष्ट शब्दात लिहून इतर सेवार्थ पुसून टाकावे लागणार आहे.

खासगी टँकरधारकांना पाणी कुठून आणणार, त्याची माहिती देऊन पालिकेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. यापूर्वी अशा प्रकारची कोणतीही माहिती टँकर लॉबी देत नव्हती. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे पाणी रहिवाशांच्या बोकांडी मारले जात होते. या कारणास्तव शहरात कॉलरा आणि इतर साथीच्या आजारांची शक्यता वर्तवली जात होती. पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या व बांधकामाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचे दर वेगवेगळे आहेत. पाणीटंचाईचा संधी घेऊन पनवेलमधील टँकर लॉबी पाण्याचे अवाच्या सवा दर आकारात होती. टँकर धोरणानुसार हे दर पालिकेच्या टँकरला मिळते जुळते राहणार आहेत.

पाणीपुरवठा तपासला जाणार

पालिके टँकरचे दर त्याच्या किलोमीटर व ठरविले जातात. त्यामुळे यात काही टँकर माफिया टँकर घोटाळादेखील करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेच्या टँकरवर जीपीएस प्रणाली लावली जाणार आहे. त्यामुळे त्या टँकरने केलेला पाणीपुरवठा जीपीएस प्रणालीनुसार तपासला जाणार आहे. त्यानंतरच या पुरवठय़ाचे शुल्क अदा केले जाणार आहे.

येत्या काळात तीव्र टंचाई

पनवेलला एमआयडीसी, जीवन प्राधिकरण, सिडको या स्वायत्त संस्थाकडून पाणीपुरवठा केला जातो. पालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातील पाणीपुरवठा या माहिन्याअखेर संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात पनवेलमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई जाणवणार असून सर्वत्र टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे हे टँकरधोरण महत्त्वाचे ठरणार आहे.

पनवेलच्या काही भागात पाणीटंचाई सुरू झाली आहे. पालिका आपल्या परीने नियोजन करीत आहे. यात ही टँकर पॉलिसी ठरविणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ात सुसूत्रता येईल. टँकरने पाणीपुरवठय़ाचे वेळाप्रत्रक तयार केले जाणार आहे.   – प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button