पहिल्याच सभेत प्रियांका गांधींचा मोदींवर निशाणा
![40% women candidates from Congress in Uttar Pradesh; Priyanka Gandhi's announcement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/priyanka-gandhi-1.jpg)
गांधीनगर : काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपल्या पहिल्याच जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंधरा कोटी रोजगाराचे काय झाले ? असा प्रश्न मोदींना विचारा, असे आवाहन त्यांनी जनसमुदायाला केले.
काँग्रेस कार्यकारिणीची बैठक मंगळवारी अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर गांधीनगर येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्या बोलत होत्या. प्रियांका गांधी यांचे हे पहिलेच जाहीर भाषण होते.
हा देश प्रेम, दया आणि बंधुभावाचा पायावर उभा आहे. सध्या देशात जे काही चालू आहे ते वाईट आहे, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. ही निवडणूक नेमकी काय आहे, याचा विचार करा. या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे भविष्य निवडणार आहात. त्यामुळे अनावश्यक मुद्दे पुढे आणले जाऊ नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, महिलांना सुरक्षित कसे वाटेल, शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, हे या निवडणुकीतील खरे मुद्दे आहेत, असे त्यांनी सांगितले.
मोदींना गुजरातमध्येच घेरण्याची काँग्रेसची रणनीती
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे होम ग्राउंड असलेल्या गुजरातमध्येच गुंतवून ठेवण्याची रणनीती भाजपने आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता काँग्रेस गोटातून व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक मंगळवारी अनेक वर्षानंतर गुजरातमधील अहमदाबाद येथे झाली. पक्षाध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्योतिरादित्य शिंदे आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.