पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी अण्णा हजारेंना साक्षीदार करा
निंबाळकरांच्या पत्नीची हायकोर्टात याचिका
मुंबई – कॉंग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना सरकारी साक्षीदार करा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभिर दखल घेतली आहे.
राजकीय वैमानस्यातून कॉंग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची 2006 साली नवी मुंबईतील कळंबोली येथे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सात जणांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यात अण्णा हजारे यांना साक्षीदार म्हणून बोलविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांनी उच्च न्यायालयाला केली आहे.
या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर आज सुनावणी झाली. यावेळी सीबीआयनेही पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येमागे नेमके प्रमुख कारण काय असू शकते, याचा उलगडा अण्णा हजारे करू शकतात, असा दावा केला आहे. याची दखल घेऊन न्यायालयाने या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत आरोपींचे जबाब नोंदवू नयेत, असा आदेश दिला आहे.