पंतप्रधान मोदी स्वतः खात नाहीत, पण दुस-याला खाऊ घातलेला वाटा मागतात – प्रकाश आंबेडकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/images.jpg)
आैरंगाबाद – न खाऊंगा ना खाने दुंगा ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा दिली. याच घोषणेचा समाचार भारिप बहूजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेत पंतप्रधान मोदींवर त्यांनी निशाणा साधला. ते आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः खात नाहीत हे खरं आहे, ते दुसऱ्याला खाऊ घालतात आणि त्यात वाटा मागतात असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर अनुसुचित जाती-मुस्लीम ऐक्याचा एल्गार बघायला मिळाला. बहुजन वंचित आघाडीची आज (मंगळवारी) सभा आयोजित करण्यात आली आहे जनतेला संबोधित करताना आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभक्ती देशोधडीला लावणारी आहे. मोदींनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करताना सध्या दिसत आहेत. त्यांच्या कारभारात देश बुडवण्याचे धोरण आहे. मॉब लिन्चिंगचे प्रकार देशात चालले आहेत. ते अत्यंत चुकीचे आहेत, गोमांस घेऊन जातोय असा आरोप करत निष्पापांचे बळी घेतले जात आहेत. हे प्रकार घडू नयेत म्हणून ओबीसी समाजाने दक्ष राहिलं पाहिजे असंही आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
एवढंच नाही तर इंधनाच्या वाढत्या दरांवरही त्यांनी भाष्य केलं. रिलायन्सची दिवाळखोरी संपवण्यासाठी पेट्रोलचे दर १०० रुपयांपर्यंत पोहचू लागले आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत तर मग पाकिस्तानमध्ये पेट्रोल ३५ रुपये लिटर आणि श्रीलंकेत पेट्रोल २८ रुपये लिटरने कसं मिळतं? आंतरराष्ट्रीय बाजारातून सरकार कोणत्या दराने कच्चं तेल खरेदी करतं याचं उत्तर एकदा सरकारने द्यावं असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
याच भाषणात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोदी सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली. भाजपाने देशाचा मालक असल्यासारखे वागू नये. उद्योजकांची कर्जे तुम्ही माफ करता आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम हे सरकार करतं आहे. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले होते हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांना सालगड्यासारखं वागवण्याचा आहे. शेतकरी तुमचा नोकर आणि तुम्ही मालक असं नाही. तुम्ही फक्त पाच वर्षांसाठी सत्तेवर आला आहात हे लक्षात ठेवा असेही प्रकाश आंबेडकर यांनी सुनावले.