नेरूळ ते खारकोपर लोकल सेवेला उदंड प्रतिसाद
मुंबई : नेरूळ ते खारकोपर उपनगरीय रेल्वे सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यात बामनडोंगरी स्थानकाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सोमवारी १९ हजार तर मंगळवारी १८ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वेकडून नेरूळ ते उरण रेल्वे प्रकल्प राबविला जात असून यातील नेरूळ ते खारकोपर अशा पहिला टप्प्याचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सोमवारपासून नियमितपणे नेरूळ ते खारकोपर मार्गावर २० आणि बेलापूर ते खारकोपर मार्गावर २० फेऱ्या चालविण्यात आल्या. यात प्रकल्पातील बामनडोंगरी स्थानकातून प्रवाशांनी मोठय़ा प्रमाणात प्रवास केला आहे.
सोमवारी बामनडोंगरी स्थानकातून ३,५१५ तिकिटांची विक्री झाली असून १९ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. यामधून एक लाख दोन हजार रुपये उत्पन्न मिळाले. तर मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत २,७५० तिकिटांची विक्री होताना १८ हजार प्रवाशांनी बामनडोंगरीतून प्रवास केला.
१२ नोव्हेंबर रोजी खारकोपर स्थानकांत १,५३७ तिकिटे विकली गेली असून एकूण ७,६४७ प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून ४४ हजार ९५२ रुपयांची कमाई झाली आणि मंगळवारी सायंकाळपर्यंत साडेतीन हजार प्रवाशांनी खारकोपर स्थानकातून प्रवास केल्याचे सांगण्यात आले.
दोन दिवसांत ३७ हजार प्रवासी