निकाल घटूनही प्रवेशाची परीक्षाच!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Result-.jpg)
आरक्षण आणि इतर मंडळांच्या वाढलेल्या निकालांचा परिणाम; वाणिज्यमध्ये चुरस
मुंबई विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत यंदा घट झाली असली तरी नव्याने लागू झालेली आरक्षणे आणि इतर मंडळांचे वाढलेले निकाल यांमुळे यंदाही प्रवेशाची परीक्षाच असण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद असलेल्या वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी अधिकच चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. इतर शाखांतील विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या घटली असली, तरी मुंबईसह बहुतेक सर्वच विभागांमध्ये वाणिज्य शाखेतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. गेली दोन वर्षे बारावीच्या परीक्षेतील सढळ गुणदानाला यंदा ओहोटी लागली आहे. राज्यातील निकालात घट झाली आहे. असे असले तरी प्रवेशाची परीक्षा मात्र यंदाही सोपी नसल्याचेच चित्र आहे.
यंदा नव्याने मराठा समाजासाठी १६ टक्के व आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे खुल्या गटासाठी २२ टक्केच जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे संस्थांतर्गत प्राधान्यानुसार म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालयाला जोडून असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश देऊन राहिलेल्या जागांवर आरक्षणे वगळून खुल्या गटासाठी जागा उपलब्ध असतील. त्यातच यंदा केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई), आयसीएस या परीक्षांचे निकाल वाढले आहेत. राज्यमंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या परीक्षांना बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांपैकी अगदी नाममात्र म्हणजे पन्नास पेक्षाही कमी विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. राज्यमंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये नव्वद टक्क्यांपुढील विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे प्रवेशाच्या स्पर्धेत राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांना इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या निकालांना तोंड द्यावे लागणार आहे. नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी इतर मंडळातून परीक्षा देणारे विद्यार्थी सरस ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याकडे मुंबईतील विद्यार्थ्यांचा कल असल्याने मुंबईत या शाखेतील प्रवेशासाठीची चढाओढ कमी होण्याची अजिबातच चिन्हे नाहीत. विज्ञान शाखेनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांचे अधिक प्राधान्य असते. मात्र वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे प्राधान्य हे पारंपरिक पदवी अभ्यासक्रमासाठी तुलनेने अधिक असते. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशपात्र गुण (कट ऑफ) काहीसे वाढण्याचीच शक्यता आहे. मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रात येणाऱ्या कोकण विभागातही वाणिज्य शाखेतील विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मुंबई, पुण्यामध्ये पदवी अभ्यासक्रम करण्यासाठी बाहेरूनही विद्यार्थी येतात. विज्ञान आणि कला शाखेच्या प्रवेश पात्र गुणांमध्ये मात्र घसरण होण्याची शक्यता आहे.
कला शाखेची महाविद्यालये ओस?
कला शाखेच्या निकालात घट झाल्याने अनेक महाविद्यालयांना रिक्त जागांच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून उत्तम गुण मिळालेले विद्यार्थी कला शाखेकडे वळत असले तरी एकूण प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटते आहे. यंदा त्यात अधिकच भर पडण्याची शक्यता आहे. छोटय़ा, तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांचा प्रश्न अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
पाच वर्षांतील नीचांकी निकाल : राज्याचा बारावीचा निकाल ८५.८८ टक्के लागला असून, गेल्या पाच वर्षांतील हा सर्वात कमी निकाल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २.५३ टक्क्यांनी घट झाली असून यंदा निकालात कोकण विभागाने सलग आठव्या वर्षी राज्यात अव्वल स्थान राखले. – पान ५
स्पर्धा शिगेलाच
यंदा मुंबईतील तिन्ही शाखांमधील मिळून ७५ टक्क्यांपुढील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट.
वाणिज्य शाखेतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थी संख्येत मात्र वाढ.
मुंबईत २ हजार २१० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण. त्यातील १८०० विद्यार्थी वाणिज्य शाखेचे.
गेल्यावर्षी २१,८४८ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी. यंदा ही संख्या २४,०५४.
कला शाखेत जागा रिक्त
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत कला शाखेच्या ६०,०२८ जागा उपलब्ध.
मात्र मुंबई विभागात कला शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ३७,१४४ आहे, तर कोकण विभागात ७,४००.
यातील अनेक विद्यार्थी विधि, ललित कला आणि इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यामुळे कला शाखेच्या १२ ते १५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता.