नाटय़निर्माता संघाच्या बैठकीत वाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/prasad-kanbli.jpg)
प्रसाद कांबळी यांनी शिवीगाळ केल्याचा सुशील आंबेकर यांचा आरोप
मुंबई : मराठी व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाच्या नव्या आणि जुन्या समितीमध्ये सामोपचार व्हावा यासाठी घेतलेल्या सभेत अजून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा येथे झालेल्या सभेत नाटय़ निर्माता संघाच्या अध्यक्षपदावरून गेली दोन वर्षे सुरू असलेल्या वादाबद्दल बोलत असताना नाटय़ निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आपल्याला शिवीगाळ केली आणि धमकी दिली अशी तक्रार नाटय़ निर्माता संघाचे सदस्य सुशील आंबेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
नाटय़ निर्माता संघाच्या वादासंदर्भात जुन्या समितीतील किरण कामेरकर यांनी या तिढय़ासंदर्भात वकिलांशी बोलावे लागेल, असे सभेत सांगितले. तेव्हा एक महिन्यापासून आमचे वकील आम्हाला निर्णय घ्यायला सांगत असताना तुम्ही झोपा काढत होता का, असा उलट प्रश्न चढय़ा आवाजात प्रसाद कांबळी यांनी केला. त्या वेळी प्रसाद आवाज चढवून बोलू नकोस, आवाज आम्हालाही चढवता येतो, असे सुशील आंबेकर बोलल्यावर प्रसाद कांबळी शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेले.
त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या सभासदांनी त्यांना आवरले; परंतु प्रसाद कांबळी यांनी या वेळी तुमचा व्यवसाय बंद करेन, अशी धमकीही आपल्याला दिल्याचे आंबेकर यांनी सांगितले.
आंबेकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असल्याचे सांगितले.
‘ कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली’
या संदर्भात सुशील आंबेकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ८ ऑगस्टला सायंकाळी तक्रार अर्ज दाखल केला असून पोलिसांनी तो स्वीकारून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे; पण या झाल्या प्रकारामुळे मी आणि माझे कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली आहोत, असे आंबेकर यांनी सांगितले. आंबेकर यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जाची प्रत आपल्याला अद्याप मिळाली नसल्याचे सांगत प्रसाद कांबळी यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.