breaking-newsमहाराष्ट्र

नांदेड, परभणीतील सात जणांचा प्रयागराज येथे बुडून मृत्यू

  • अस्थिविसर्जनासाठी गेले असताना होडी उलटली; एकजण बेपत्ता

 नांदेड/परभणी – नांदेड व परभणी जिल्ह्यातल्या दोन कुटुंबांतील १४ सदस्य उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एका दुर्घटनेत सापडून त्यांतील सात जण मरण पावले. तर एक जण अजूनही बेपत्ता आहेत. या कुटुंबातील सहा जण सुखरूप असल्याची माहिती भाजपचे नेते राजेश पवार यांनी वाराणसी येथून दिली.

नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजप कार्यकत्रे रमेश बस यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी बस व परभणी जिल्ह्यातील दैठणा येथील कच्छवे कुटुंबातील सदस्य प्रयागराज येथे गेले असता तेथील कीडगंज येथील सरस्वती घाटावर सोमवारी त्यांची होडी उलटल्यामुळे सर्व जण नदीपात्रात पडल्याची माहिती सायंकाळी येथे आली. या दुर्घटनेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिगंबर बस (वय ७५), जलसंपदा खात्यात उपअभियंता असलेले त्यांचे पुत्र बालाजी बस (वय ५०) यांच्यासह बाबुराव ऊर्फ भोजराज  शिसोदे (वय ७०), भागाबाई कच्छवे (वय ६५), राधाबाई कच्छवे (वय ५५), लक्ष्मीबाई कच्छवे (वय ५५, रा. तिघेही दैठणा) यांचा मृत्यू झाला. तर मंगळवारी सायंकाळी पशुवैद्यकीय अधिकारी असलेले देविदास कच्छवे यांचा मृतदेह हाती लागल्याची माहिती कीडगंज पोलीस, मृतांच्या नातेवाइकांनी दिली. बस कोलंबीचे रहिवासी तर इतर चौघे जण परभणी जिल्ह्यातील दैठणा व माखणी येथील आहेत. कोलंबी येथील रमेश दिगंबर बस वरील दुर्घटनेत बेपत्ता असल्याने मंगळवारी दिवसभर त्यांचा शोध सुरू होता. या दुर्घटनेतील मनोहर माणिकराव बस, सुनीता देविदास कच्छवे, ज्योती बालाजी बस, अंगद नारायण कच्छवे, केशव ज्ञानोबा कच्छवे व मीनाक्षी पटवार हे सहा जण बचावले असल्याची माहिती कीडगंज येथील पोलिसांनी नांदेड जिल्हा प्रशासनाला कळविली आहे.

मदतीसाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क

या दुर्घटनेची माहिती येथे मिळाल्यानंतर भाजपचे नेते राजेश पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली होती. त्याची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संरक्षणमंत्र्यांना तातडीने पत्र पाठवून मृतदेह व इतर जखमींना नांदेड जिल्ह्यात आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्तांना नांदेडला आणण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था झालेली आहे. पण एका जणाचा ठावठिकाणा लागलेला नसल्यामुळे सर्व जण तेथे थांबले आहेत.

दैठणा गावावर शोककळा

या दुर्घटनेतील मृत तीन महिला रहिवासी असलेल्या दैठणा (जि. परभणी) गावावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी गावची संपूर्ण बाजारपेठ बंद होती. बुधवारी सायंकाळपर्यंत मृतदेह दैठणा येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दैठणा येथील भाजपचे कार्यकत्रे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक नारायणराव कच्छवे यांचे बस परिवाराशी जवळचे नाते होते. नारायणराव कच्छवे यांच्या आई राधाबाई केशवराव कच्छवे तसेच लक्ष्मीबाई केशवराव कच्छवे, भागूबाई बळिराम कच्छवे या तिघी जणी असे एकूण १४ जण प्रयागराज येथे चार डिसेंबरला रवाना झाल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button