धुळ्यात भाजपला धक्का, आमदार अनिल गोटेंनी घेतली शरद पवारांची भेट
मुंबई – धुळ्यात भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने भाजपात खळबळ उडाली आहे. धुळ्यात भाजपाच्या खासदाराचा पराभव करणे हेच आपले मिशन असल्याचे गोटींनी म्हटलं आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे लोकसभेत धुळ्याचं प्रतिनिधीत्व करत होते. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढण्यासाठी गोटींनी दंड थोपटले आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून अनिल गोटे आणि शरद पवार यांच्यातील वैर आता संपुष्टात आल्याचं दिसतंय. मतभेद बाजुला ठेवून आमदार गोटींनी शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धुळे महापालिका निवडणुकीपासून गोटे पक्षावर नाराज आहेत. आता त्यांनी थेट खासदार भामरेंविरोधात निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठीच्या मोर्चेबांधणीसाठी गोटेंनी पवारांची भेट घेतली आहे. तेलगी प्रकरणावरुन गोटे आणि पवार यांच्यात हाडवैर निर्माण झालं होतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गोटे यांना तेलगीचा मित्र म्हटल्यानं वाद निर्माण झाला होता. पवार आणि गोटे यांचं विळ्या भोपळ्याचं नातं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं होतं. मात्र, आता गोटेंनी भामरेंच्या पराभवासाठी पवारांची भेट घेतली आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असं गोटेंनी पवारांच्या भेटीनंतर म्हटलं. लोकसभा निवडणुकीआधी गोटेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.
- ‘धुळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. गुन्हेगारी, टक्केवारी वाढली आहे. पक्षातील ही घाण साफ करायची आहे. ‘मी माझी भूमिका शरद पवारांना सांगितली आहे. मला माझा पक्ष स्वच्छ करायचा आहे. आता मला कशी मदत करायची, हा त्यांचा निर्णय असेल. मी पुन्हा पवारांना भेटणार आहे.
- अनिल गोटे, आमदार