धनगर आरक्षणासाठी परभणीत तरुणाची आत्महत्या, मोबाईलवरचा मेसेज ठरला अखेरचा
परभणी : मराठा आरक्षणानंतर आता आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. पण या सगळ्यात धनगर आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यात एका तरूणाने आत्महत्या केली आहे. सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथे एका तरुणाने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश राधाकिशन कारके (२०) असे या तरुणाचे नाव आहे.
‘मी धनगर समाजासाठी जीव देत आहे’ असा मेसेज काहींना पाठवत त्याने आत्महत्या केली. शासनाकडून ५० लाखांची मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी धनगर समाजाने निवेदनाद्वारे केली आहे. तरुणाच्या या आत्महत्येमुळे धनगर समाज आणि मुलाचे कुटुंबिय संतप्त झाले आहेत
धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी आज १३ ऑगस्ट रोजी गंगाखेड, सेलू येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पाथरी तालुक्यात मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. परभणी येथेही निवेदन दिले जाणार आहे.
आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे. या तिथीचं औचित्य साधून धनगर समाज राज्यभरात रस्ते आणि महामार्गांवर रास्ता रोको आंदोलनाच्या स्वरूपात ही तिथी साजरी करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी सकाळी ११ वाजता हे आंदोलन सुरू होईल.