धक्कादायक! ससून रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल
![Shocking! Paracommando Nikhil Burande from Ballarpur commits suicide at Agra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/DEAD-BODY-Frame-copy-2.jpg)
पुणे | महाईन्यूज
ससून सवरेपचार रुग्णालयाच्या शवागारातून दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनुक्रमे बासष्ट आणि सत्तर वर्षे वयाच्या दोन महिला रुग्णांचे मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका महिलेच्या नातेवाइकांकडे मृतदेह सुपूर्द करताना ही अदलाबदल झाल्याचे निदर्शनास आले आहे.ससून रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. तांबे म्हणाले, दोन महिला मृतांपैकी एका महिलेच्या मुलाने सकाळी साडेआठ वाजता ससून रुग्णालयातील शवागारात येऊन आईचा मृतदेह ओळखला व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तो त्याने ताब्यात घेतला होता.
रात्री साडेअकरा वाजता दुसऱ्या मृत महिलेचे कुटुंबीय रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले. त्या वेळी तो मृतदेह त्यांच्या घरातील महिलेचा नसल्याचा दावा कुटुंबातील सदस्यांनी केला. मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे लक्षात येताच सर्वप्रथम ज्या कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला होता, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तोपर्यंत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.दोन्ही कुटुंबीयांनी त्यानंतर ससून रुग्णालयात परस्परांची भेट घेतलेली आहे. अंत्यसंस्कार पूर्ण झालेल्या मृतदेहाची रक्षा दुसऱ्या महिलेच्या कुटुंबीयांना देण्यात आली, असेही त्यांनी सांगितले आहे. मृतदेहाची अदलाबदल ही गंभीर बाब असून त्याबाबत चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याची माहितीही ससून रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.