धक्कादायक! शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा बेकायदेशीर प्रॅक्टिस, स्त्री भ्रूणहत्येतील दोषी सुदाम मुंडेला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Sudam-Munde-illegal-abortions.jpg)
बीड: देशभर गाजलेल्या बीडमधील स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य दोषी डॉ. सुदाम मुंडे याने शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा बेकायदेशीरपणे वैद्यकीय प्रॅक्टिस सुरु केल्याचं समोर आलेलं आहे. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने आज (6 सप्टेंबर) पहाटे परळीतील मुंडे हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा टाकलेला आहे. यात हॉस्पिटलमधील साहित्य जप्त करण्यात आलं आहे. तसेच पोलिसांनी सुदाम मुंडेला अटक केलेली आहे. तो डॉक्टर असलेल्या मुलीच्या नावाने स्वतः प्रॅक्टिस करत होता. स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी देशभर गाजलेल्या प्रकरणातील मुख्य दोषी डॉ. सुदाम मुंडेची न्यायालयाने वैद्यकीय पदवी कायमस्वरुपी रद्द केलेली आहे.
मात्र तरीही त्याच्याकडून न्यायालयाचे सर्व आदेश धुडकावून पुन्हा प्रॅक्टिस सुरु होती. जिल्ह्यातील काही लोकांनी सुदाम मंडेच्या या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे तक्रार केलेली होती. यानंतर अखेर आज पहाटे पोलिसांनी परळीतील नंदागौळ रोडवरील मुंडे हॉस्पिटलवर छापा टाकला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून सुदाम मुंडे बिनधिक्कतपणे प्रॅक्टिस करत होता. या हॉस्पिटलचा परवाना मुंडे याच्या डॉक्टर मुलीच्या नावाने आहे. असं असतानाही सुदाम मुंडे आपल्यावरील बंदीला झुगारुन प्रॅक्टिस करत होता.