देशात एका वर्षांत ५० लाख दखलपात्र गुन्ह्य़ांच्या नोंदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/crime_201707718.jpg)
- सव्वा लाख आर्थिक गुन्हे, ५८ हजार दंगली
मुंबई : देशात २०१७ या एका वर्षांत वेगवेगळ्या प्रकारच्या ५० लाख ७ हजार ४४ गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. त्यात सव्वा लाख आर्थिक गुन्ह्य़ांचा तसेच ५८ हजार दंगलींच्या गुन्ह्य़ांचा समावेश आहे. आधीच्या वर्षांच्या तुलनेत एकूण गुन्ह्य़ांच्या घटनांमध्ये ३.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या २०१७ च्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
भारतीय दंड संहिता व स्थानिक कायद्यांखाली या गुन्ह्य़ांची नोंद करण्यात आली आहे. देशात २०१७ मध्ये विविध प्रकारच्या १ लाख २७ हजार ३४० आर्थिक गुन्ह्य़ांच्या नोंदी झाल्या आहेत. त्यात विश्वासघात, बनावट कागदपत्र तयार करणे, फसवणूक व भ्रष्टाचार या प्रकरणांचा समावेश आहे. २८ कोटी १० लाख १९ हजार २९४ रुपये किमतीच्या ३ लाख ५५ हजार ९९४ इतक्या नकली नोटांचे प्रकरण उघडकीस आले आहे. आर्थिक गुन्ह्य़ांच्या नोंदीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्रात १३ हजार ९४१ गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. आर्थिक गुन्हेगारीत राजस्थानचा क्रमांक पहिला आहे. या राज्यात २१ हजार ६४५ गुन्ह्य़ांची नोंद आहे. दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशात २० हजार ७१७ प्रकरणांची नोंद झाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ९२५ गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल ओरिसा (४९४) व राजस्थान (४०४) या प्रकरणांची नोंद आहे. देशात अशा प्रकारच्या एकूण ४०९२ गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे.
देशभरात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे अवहालात म्हटले आहे. २०१७ मध्ये ८६ हजार विनयभंगाच्या घटना घडल्या असून, ही ९ टक्के वाढ असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ९५ हजार ८९३ अपहरणाच्या घटनांची नोंद आहे. त्यात ४२ हजार ३२६ लहान मुलींचे व ३४ हजार ४१५ महिलांच्या अपहरणाचा समावेश आहे. १२ हजार २१३ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यात लैंगिक अत्याचाराच्या १४६० प्रकरणांचा समावेश आहे.
देशात शांतता भंग केल्याचे ७८ हजार ५१ प्रकरणे घडली असून, त्यात ५८ हजार ८५० दंगलीच्या गुन्ह्य़ांचा समावेश आहे. अनुसूचित जातीवर २२ हजार १५९ व अनुसूचित जमातीवर ३ हजार ४६९ जातीय अत्याचार करण्यात आल्याच्या गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे.