दुष्काळामुळे बैलजोडी विकली; आता पेरणीसाठी शेतक-यानं स्वत:ला जुंपले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/osmanabad.jpg)
कळंब – दुष्काळामुळे बैलजोडी विकली, आता पैसे नसल्याने स्वतःला तिफणीला जुंपून घेत सोयाबीनची पेरणी करायची वेळ उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील फरताडे कुटुंबियांवर आली आहे.
चार वर्षांपासून पावसाने पाठ फिरवल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पेरणी तर दूरच, पण जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नाने बळीराजा त्रस्त झाला होता. शेतकऱ्यांना प्रशासनाने उभारलेल्या चारा छावण्यांचा आधार झाला.
यंदा उशिरा का होईना जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे बळीराजा पेरणीच्या कामाला लागला आहे. कोणी ट्रॅक्टरने, तर कोणी परंपरागत बैलजोडीने आपल्या शेतात पेरणी करत आहे. मात्र, फरताडे दांपत्याकडे बैलजोडी नसल्याने स्वत:ला तिफणीला जुंपून पेरणी करत आहेत. ही घटना समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त होते आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगरूळ या गावचे रहिवासी असलेल्या फरताडे कुटुंबीयांकडे असलेली जेमतेम कोरडवाहू शेती आणि बिकट आर्थिक परिस्थिती, मुलीच्या लग्नात काढलेल्या कर्जाची परतफेड यामुळे त्यांच्यावर आपली जिवापाड जपलेली बैलजोडी विकायची वेळ आली. आता ते कसाबसा आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.