दाभोलकर हत्याकांड : अमोल काळेला 14 सप्टेंबरपर्यंत कोठडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/download.jpg)
पुणे – पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील प्रमुख आरोपी अमोल काळे याचा केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने ताबा घेतल्यानंतर आज (गुरुवार) त्याला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
अमोल काळे याचा सीबीआयने बुधवारी बंगळूर येथील तुरुंगातून ताबा घेतला होता. तो डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडातीलही मास्टरमाइड असावा, असा सीबीआयच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. काळेला गुरुवारी पुण्यातील न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम.ए. सय्यद यांनी त्याला कोठडी सुनावली.
काळे आणि डॉ. दाभोलकर हत्याकांडातील संशयित सचिन अंदुरे यांची औरंगाबादमध्ये भेट झाली होती. त्या वेळी काळे तेथील लॉजवर राहिला होता. औरंगाबादमधील वास्तव्यादरम्यान काळे याने अंदुरेला एक पिस्तूल दिले होते. दरम्यान, काळेने अंदुरेकडे दिलेल्या पिस्तुलाबाबतचा अहवाल प्रलंबित असल्याचे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले आहे. सीबीआय कोठडी दरम्यान याची चौकशी करण्यात येणार आहे.