breaking-newsपुणेमहाराष्ट्र

दहावी दिली आणि वयाच्या चौदाव्या वर्षी लग्न झाले.!

निकालाच्या पार्श्‍वभूमीवर खास मुलाखत: राज्य बोर्डाच्या अध्यक्षांचा खडतर प्रवास

  •  गावकऱ्यांसाठीची शकू ते बोर्डाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे

पुणे– मागील दहा वर्षांची आकडेवारी काढून पाहिली तर प्रत्येक वेळी दहावी बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या मुलींची संख्या कमी व मुलांची संख्या अधिक असते. मात्र निकालात कायम मुलींचीच बाजी असलेली पहायला मिळते. अशाच एका मुलीने दहावीची परीक्षा दिली आणि तिचे लग्न करुन टाकण्यात आले मात्र तिच मुलगी आज त्याच बोर्डाच्या अध्यक्षपदावर बसली आहे. गावातल्यांसाठीची शकू ते डॉ.शकुंतला काळे यांचा हा प्रवास यंदाच्या वर्षी दहावीच्या निकालाच्या निमित्ताने फार उल्लेखनीय ठरणारा आहे.
शंकुतला काळे यांचा जन्म हा पुणे येथील घोडेगाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. आईवडिलांना उशीरा झालेली मुलगी म्हणून डॉ.शकुंतला काळे या लाडक्‍या होत्याच पण दुर्देवाने त्या दहा-अकरा वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या मागे त्यांच्या आईने मोलमजुरी करुन मुलीला दहावीपर्यंतचे शिक्षण दिले. दहावीच्या पुढे गावात शिक्षण मिळत नसे, मुलींना बाहेरगावी शिकायला पाठविणे त्याकाळी तसे अवघडच त्यामुळे आईने शकुंतला यांचे लग्न लावून दिले. त्यावेळी त्यांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. त्यात त्यांना 78 टक्‍के गुण मिळाले. त्याकाळी इतके गुण मिळवून त्या केंद्रात मुलींमध्ये त्या प्रथम आल्या होत्या. लग्नानंतर दोन मुलं झाली व त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना त्यांच्या सासऱ्यांनी खूप पाठिंबा दिला असल्याचे त्या सांगतात. दोन मुले झाल्यानंतर बारावी, डीएड मग बीएड पूण केले. ज्या शाळेत त्या शिकल्या त्याच शाळेत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. मग एमपीएससीची परीक्षा देऊन वर्ग 2 च्या अधिकाऱ्यापर्यंत त्यांचा प्रवास झाला. या प्रवासात दोन मुलांना सांभाळत, घर सांभाळत त्यांनी सर्व शिक्षण पूर्ण केले. त्या म्हणाल्या, या काळात मी बऱ्याचदा केवळ चार तास झोपायचे. रात्रीच्या वेळीच अभ्यासाला वेळ मिळायचा त्यामुळे त्यावेळीच मी अभ्यास करायचे. मी रेडिओच्या बातम्या ऐकायचे त्यावरुनच मी एमपीएससीचा अभ्यास केला असेही त्यांनी सांगितले. वर्ग एकसाठीहीचीही परीक्षा दिली आणि त्यातही पास होत वर्ग एकच्या अधिकारी झाल्या. त्यानंतर शिक्षण विभागात विविध पदांवर काम करत करत 2017 साली त्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्याच्या अध्यक्षा झाल्या. त्यांनी ग्रामीण कादंबरीतील स्त्री या विषयात डॉक्‍टरेटही मिळवली. आज जेव्हा निकाल जाहीर करताना त्यांचे फोटो वर्तमानपत्रातून झळकतात तसेच चॅनेलवर त्या जेव्हा दिसतात तेव्हा त्यांच्या गावकडील लोक अभिमानाने त्यांच्या मुलींना त्या छोट्याश्‍या शाकूची कहानी सांगतात.
आजही अनेक पालक परिस्थितीमुळे किंवा अन्य सामाजिक कारणांमुळे मुलींना दुय्यम स्थान देतात. दरवर्षी मुली निकालात अव्वल असतात मात्र परीक्षा देण्यात त्यांची संख्या मुलांच्यापेक्षा कितीतरी पटींनी कमी असते. या अशा प्रेरणादायी कहानीतून तरी मुलींना शिकू न देणाऱ्या पालकांना एक दिशा मिळेल अशी आशा व्यक्‍त करायला हरकत नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button