तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांची संख्या १८
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/tiware-dam.jpg)
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरणफुटीतील मृतांचा आकडा १८ वर पोहोचला आहे. दुर्घटनेतील आणखी पाच जणांचे मृतदेह गुरुवारी आढळले. अद्याप चार जण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.
तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटल्यानंतर २२ ग्रामस्थ बेपत्ता झाले होते. बुधवारी संध्याकाळपर्यंत त्यातील १३ जणांचे मृतदेह सापडले. त्यांच्यावर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी आणखी पाच मृतदेह सापडले. त्यापैकी चौघांची ओळख पटली असून, ऋतुजा रणजित चव्हाण, रणजित अनंत चव्हाण, संजय रामचंद्र पवार आणि रणजित काजवे अशी त्यांची नावे आहेत. त्यातील तिघेजण तिवरे येथील रहिवाशी असून, रणजित काजवे हा पोफळी येथील तरूण त्या रात्री चव्हाण कुटुंबीयांकडे भोजनासाठी आला असता या दुर्घटनेचा बळी ठरला.
आकले गावातील रवींद्र भाताडे ‘एनडीआरएफ’च्या एका पथकाला घेऊन गुरूवारी सकाळी कळकवणेतील नदीपात्रात मृतदेहांचा शोध घेत होते. त्यावेळी रामवरदायिनी मंदिरापासून पुढे काही मीटर अंतरावर त्यांना एक मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याची ओळख पटलेली नाही. ऋतुजा चव्हाण यांचा मृतदेह चिपळूणजवळ वाशिष्ठी नदीच्या पात्रात सापडला. तिवरे ते चिपळूण हे अंतर सुमारे ३५ किलोमीटर आहे. पाण्याच्या लोंढय़ामुळे तिवरेतील मृतदेह इतक्या लांब वाहून आल्याचे स्पष्ट झाले. या दुर्घटनेतील चार जण अद्यापही बेपत्ता आहेत.
दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच मृतांपैकी सहाजणांच्या निकटच्या नातेवाईकांना राऊत यांच्या हस्ते प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत देण्यात आली. पाण्याच्या लोंढय़ामध्ये घरे वाहून गेलेल्या, पण बचावलेल्या ग्रामस्थांची गावातील शाळेत तात्पुरती निवासाची सोय करण्यात आली आहे. त्यापैकी काहीजणांनी शासकीय पातळीवरील निष्क्रियता या दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप माध्यमांशी बोलताना केला.