…तर शिवसेना तोंडावर पडली असती – देवेंद्र फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/fadnavis-and-uddhav-5.jpg)
मुंबई : शिवसेनेने माझी ऑडिओ क्लिप ऐकवली त्यामध्ये मोड- तोड करुन ती लोकांना ऐकवण्यात आली. साम-दाम-दंड- भेद याचा अर्थ कूटनीती असा होतो. कूटनीतीने प्रहार करणाऱ्यांना कूटनीतीचा उतारा द्यावा लागतो, असे माझे म्हणणे होते. त्या क्लिपच्या सुरुवातीची आणि शेवटची दोन वाक्ये ऐकवली असती तर शिवसेना तोंडावर पडली असती, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपामधील वाद शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली होती. यात फडणवीस यांनी साम-दाम-दंड- भेद याचा वापर करावा, असे म्हटल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. या कथित ऑडिओ क्लिपवरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत होती.
फडणवीस म्हणाले, ती ऑडिओ क्लिप माझीच आहे. ती ऑडिओ क्लिप १४ मिनिटांची असली तरी शिवसेनेने ती मोडून- तोडून जनतेसमोर आणली. क्लिपची पहिली आणि शेवटची दोन वाक्ये ऐकवली असती तर शिवसेना तोंडघशी पडली असती. आता मी स्वत:च ही क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे. मी काही चुकीचे केले असेल तर निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरे जाण्यास मी तयार आहे. पण मी निर्दोष सुटलो तर क्लिपमध्ये मोड- तोड करुन ती जनतेसमोर आणून त्यांची दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.