breaking-newsपुणेमहाराष्ट्र

..तर कालवाफुटीस पालिका जबाबदार!

कालव्याशेजारील बेकायदा रस्ते अतिक्रमणे रोखण्याचा जलसंपदाचा पालिकेला इशारा

पुणे : कालव्यानजीक झालेली अतिक्रमणे, अनधिकृत रस्ते आणि या रस्त्यांवरून होणारी अवैध वाहतूक अशा विविध कारणांमुळे कालव्याचा मातीचा भराव खचत आहे. अतिक्रमणे असल्याने कालव्याची कामे जलसंपदा विभागाला वारंवार करता येत नाहीत. त्यामुळे या कारणांमुळे मुठा उजवा कालवा पुन्हा फुटल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची असेल, असे पत्रच जलसंपदा विभागाने महापालिकेला दिले आहे. दरम्यान, कालव्यानजीक खचलेल्या रस्त्यांची कामे महापालिकेने हाती घेतली आहेत.

खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंतचा २८ कि.मी.पर्यंत मुठा उजवा कालवा शहरातून जातो. या कालव्याच्या जागेत अनेक अनधिकृत बांधकामे झाली असून या भागात एका लाखापेक्षा जास्त नागरीवस्ती आहे. तसेच कालव्यानजीक महापालिकेने बेकायदा डांबरी, सिमेंटचे रस्ते केले असून या रस्त्यांवरून सतत दुचाकी, चारचाकींसह जड वाहतूक होत असते. कालव्याचा भराव मातीचा असल्याने या रस्त्यांवरील वाहतुकीमुळे मातीचा भराव खचत आहे. त्यामुळे कालव्यानजीक बांधलेले अनेक रस्तेही खचले आहेत. या रस्त्यांची कामे आम्ही करू, असे महापालिकेने कळवल्यावर महापालिकेला जलसंपदा विभागाकडून ‘ना हरकत’ देण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर अनधिकृत बांधकामे, बेकायदा रस्ते आणि त्यावरील वाहतूक अशा कारणांमुळे कालवा पुन्हा फुटल्यास त्याला पालिका जबाबदार असेल, असे पत्र जलसंपदा विभागाने पालिकेला चार दिवसांपूर्वी दिले आहे, अशी माहिती जलसंपदा पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिली. कालव्याचा भराव मातीचा असल्याने त्याच्याकडेने वाहतूक होऊ शकत नाही. जनता वसाहत, हडपसर येथील शिंदे आळी यांसह अनेक ठिकाणी कालव्यानजीक बांधलेले रस्ते खचले आहेत. शिंदे आळी येथे कालव्यावर म्हशींचा गोठा बांधण्यात आला आहे.

पाणी मोजण्याबाबत वाद नाही

महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (२२ ऑक्टोबर) वारजे एक व दोन, कोपरा कुटी, हडपसर टनेल या केंद्रांवर जाऊन संयुक्त पाहणी केली. या ठिकाणी महापालिकेकडून बसवण्यात आलेल्या पाणी मोजण्याच्या यंत्रांची तपासणी करण्यात आली असून त्यानुसारच महापालिका धरण आणि कालव्यातून किती पाणी उचलते, त्याची आकडेवारी नमूद करण्यात येत आहे. त्यामुळे पाणी मोजण्यावरून दोन्ही विभागांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही. मात्र, दरवर्षी शहराची लोकसंख्या शपथपत्रावर महापालिकेने कळवणे अपेक्षित असताना, याबाबतची माहिती दिली जात नाही, असेही चोपडे यांनी सांगितले.

जलसंपदा विभागाने लक्ष वेधलेले मुद्दे

* कालव्यालगत सेवा व निरीक्षण रस्ता, कालव्यावरील पूल खचणे, अतिक्रमणे असे प्रकार झाले आहेत.

*  महापालिकेने परवानगी न घेता कालव्यानजिक डांबरी, सिमेंटचे रस्ते केले आहेत. त्यावरून जडवाहतूकही सुरू आहे.

*  दांडेकर पूल, जनता वसाहत, डायस प्लॉट, शिंदे वस्ती, बीटी कवडे रस्ता, ससाणेनगर आणि हडपसर येथे अतिक्रमणे झाली असून या ठिकाणाहून कालव्यात कचरा, राडारोडा टाकण्यात येतो. त्याचा पाणीवहनावर परिणाम होतो.

*  वडगाव बुद्रुक, स्वारगेट, महर्षिनगर येथे ओढय़ावरील जलसेतुची गळती होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button