ड्रेसचे माप घेताना नको तिथे स्पर्श, टेलरला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/tailor-women.jpg)
ड्रेस शिवण्यासाठी माप घेताना महिलेच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्या प्रकरणी खार पोलिसांनी ४४ वर्षीय टेलर हाफीझ लाडली साब शेखला अटक केली आहे. हा टेलर खार लिंकिंग रोडवर महिलांच्या कपडयांसाठी प्रसिद्ध असलेल्या दुकानासाठी काम करतो. हाफीझ शेखवर ३४ वर्षीय महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.
ड्रेस शिवण्यासाठी माप घेताना आरोपीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असा आरोप महिलेने केला आहे. टेलरच्या स्पर्शाने अस्वस्थ झालेल्या त्या महिलेने लगेच शो रुमच्या मॅनेजरला या प्रकाराची माहिती दिली व १०० नंबरवर कॉल करुन पोलिसांना बोलावून घेतले. अवघ्या काही मिनिटात खार पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी लगेच आरोपीला अटक केली. तक्रारदार महिला शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दिवाळीची खरेदी करण्यासाठी दुकानात आली होती. त्यावेळी आरोपी टेलरने कुर्तीसाठी माप घेत असताना तिचा विनयभंग केला असे पोलिसांनी सांगितले.
आमच्या दुकानात ग्राहकाबरोबर जे घडले त्याबद्दल आम्हाला खेद आहे. आम्ही असे प्रकार अजिबात सहन करणार नाही. त्या टेलरला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. ग्राहकांच्या सुरक्षेला आमचे पहिले प्राधान्य आहे. पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य करु असे दुकानाच्या प्रवक्त्याने सांगितले.