‘डीजे’च्या तालावर नवरदेवाने धरला ताल, जिल्हाधिका-यांनी काढली चांगलीच वरात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/वरात.jpg)
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
डीजेच्या तालावर कर्कश आवाजात नवरदेव चक्क विना मास्क मित्रमंडळींसोबत थिरकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवरदेव आणि नवरीच्या आई-वडिलांसह 20 ते 25 वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातल्या मोराची-चिंचोली गावात ही घटना घडली आहे.
कोरोनाच्या संकटकाळात पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी लग्न समारंभात फक्त 50 लोकांना परवानगी दिली आहे. याशिवाय मास्क, सॅनिटायझर वापरायला सांगितले आहे. मात्र, असं असताना या कुटुंबाने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे पुढे आले आहे.
डीजेच्या तालावर नवरदेव आणि त्यांचे मित्रमंडळी थिरकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. ही बाब पोलिसांना समजताच त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवासह ही सगळी मंडळी डीजेच्या तालावर थिरकताना दिसत आहेत. नवरदेवासह कोणीही मास्कचा वापर केलेला दिसत नाही. त्याचप्रमाणे सोशल डिस्टसिंगचा देखील फज्जा उडाला आहे.
गणेश आप्पासाहेब थोपटे याचं 25 जूनला लग्न होत. लग्नात कोणीही मास्क न लावता. सोशल डिस्टंसिंगचा वापर केला नाही शिवाय कोणतेही वाद्य वाजवण्याची परवानगी घेतली नाही. याबाबत नवरा मुलगा व नवरी मुलीचे आई-वडील यांच्यासह 20 ते 25 लोकांच्या विरोधात शिरुर पोलिसांत 26 जून रोजी अखेर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती शिरुरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांनी दिली आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल पालवे करत आहेत.