डीएसके प्रकरण : लेखापाल घाटपांडे आणि अभियंता नेवासकर यांच्या जामिनावर गुरूवारी सुनावणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/dsk-69-.2.jpg)
पुणे- बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांचे लेखापाल सुनील घाटपांडे आणि अभियंता राजीव नेवासकर यांच्या जामीन अर्जावर 5 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
घाटपांडे आणि नेवासकर यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, काही कारणास्तव न्यायाधीश सरदेसाई न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. घाटपांडे आणि नेवासकर यांना विशेष न्यायाधीश सरदेसाई यांनी 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. घाटपांडे यांच्या वतीने ऍड. एस. के. जैन यांनी बाजू मांडली. नेवासकर यांच्या वतीने ऍड. रोहन नहार यांनी बाजू मांडली. घाटपांडे यांना पोलिसांकडून करण्यात आलेली अटक बेकायदा आहे. त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलाविले होते. त्यावेळी तपासासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पोलिसांना उपलब्ध करून दिली होती, असे ऍड. जैन यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. नेवासकर डी. एस. कुलकर्णी यांच्याकडे काम करत होते. त्यांनी ठेवीदारांना गुंतवणुकीचे आमिष दाखवले नव्हते. ठेवीदारांची फसवणूक प्रकरणी नेवासकर यांचा संबंध नसल्याचे ऍड. रोहन नहार यांनी युक्तिवादात सांगितले होते.
दरम्यान, विशेष न्यायाधीश सरदेसाई अनुपस्थित असल्याने घाटपांडे आणि नेवासकर यांच्या जामीन अर्जावर गुरूवारी (5 जुलै) सुनावणी होणार आहे.