breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

ठाण्यातील विद्यार्थ्यांच्या विद्यापीठातील खेपा टळणार

उपकेंद्रातच आता विविध प्रमाणपत्रे उपलब्ध

एखादे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यापीठाच्या फोर्ट किंवा कलिना येथील शिक्षण संकुलात खेपा घालण्याचा त्रास ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी आता काहीसा कमी होणार आहे. ठाणे उपकेंद्रातच विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याबरोबरच अर्ज करणे, तक्रारी, नोंदणीची कामे अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रात मुंबईसह, ठाणे, रायगड, कोकणाचाही समावेश होतो. या प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. मात्र ठाण्यात उपकेंद्र असूनही विद्यार्थ्यांना कामे करण्यासाठी मुंबईच गाठावी लागत होती. याबाबत अधिसभेत सदस्यांनी अनेकदा प्रश्न मांडले होते. अखेरीस आता विद्यापीठाने ठाण्याचे उपकेंद्र सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

ठाणे जिल्ह्य़ातील संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय सुविधा या उपकेंद्रात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परीक्षा, पुनर्मूल्यांकन, पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रकातील दुरुस्ती, पात्रता नोंदणी, स्थलांतर, उत्तरपुस्तिकांची छायाप्रत मिळण्यासाठी अर्ज ठाणे उपकेंद्रातून करता येतील. त्याचबरोबर दूर आणि मुक्तशिक्षण केंद्रासंबंधीच्या (आयडॉल) सुविधाही या उपकेंद्रात मिळतील. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करणे, अध्ययन साहित्याचे वाटपही करण्यात येईल. परीक्षेच्या कालावधीत आयडॉलचे प्रतिनिधी उपकेंद्रात उपस्थित असतील. सध्या मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात बीएमएस-एमबीए आणि बीबीए-एलएलबी हे दोन एकात्मिक पाच वर्षीय अभ्यासक्रम शिकविले जात आहेत.

‘विद्यार्थ्यांना दर्जेदार व परिपूर्ण ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी विद्यापीठ यंत्रणा सक्षम करणे, त्याचबरोबर विद्यापीठाच्या कामकाजाचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे. कामात सुसूत्रता, शिस्तबद्धपणा आणण्यासाठी आणि प्रक्रियेतील वेळ वाचवून विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने ठाणे उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

-डॉ. सुहास पेडणेकर ,  विद्यापीठाचे कुलगुरू

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button