टोपी, शिट्टी आणून देतो, चौकीदारी करा : अकबरुद्दीन ओवेसीची मोदीवर टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/o-and-n.jpg)
हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नेहमी टिका करणारे एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी आता चौकीदार शब्दावरुन टीकास्त्र सोडले आहे. मोदींनी माझ्याकडे यावे. मी त्यांना टोपी आणि शिट्टी देईन, असा खोचक टोला ओवेसींनी लगावला आहे. यामुळे वाद होण्याची चिन्हे आहे.
भाजपचे ‘मै भी चौकीदार’ कॅम्पेन जोरात आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी या कॅम्पेनला सुरुवात केली. मोदींच्या या कॅम्पेनवर ओवेसींनी टीका केली आहे. मी ट्विटरवर चौकीदार नरेंद्र मोदी पाहिले. त्यांनी त्यांच्या आधार कार्ड आणि पासपोर्टवरसुद्धा चौकीदार असा उल्लेख करायला हवा. आम्हाला पंतप्रधान हवा आहे. चहावाला, पकोडेवाला नको. मोदींना खरेच चौकीदार होण्यात रस असेल, तर त्यांनी माझ्याकडे यावे. मी त्यांना चौकीदाराची टोपी आणि शिट्टी देतो,’ अशा शब्दांमध्ये ओवेसींनी मोदींवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके कोण आहेत, हे मला कळतच नाही, असं अकबरुद्दीन ओवेसी एका जनसभेला संबोधित करताना म्हणाले. मोदी कधी चहावाला होतात. तर कधी वेगळ्याच रुपात दिसतात. आता निवडणुकीच्या आधी ते चौकीदार झाले आहेत. मोदींनी आधी स्वत:ला चहावाला म्हणवून घेत देशाची दिशाभूल केली. आता चौकीदार होऊनही तेच केले जात आहे. मी चहाची किटली, गॅस देतो. मोदींनी चहा तयार करुन द्यावा, असे आधी मी म्हटले होते. त्यावेळी ते स्वत:ला चहावाला म्हणवून घ्यायचे. आता मोदी चौकीदार झालेत. त्यामुळे आता मी त्यांना टोपी आणि शिट्टी देईन. त्यांनी देशाची चौकीदारी करावी, असा टोला त्यांनी लगावला. ओवेसिंच्या या टिकेमुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/ani_digital/status/1110085274695028738