टोईंग वाहने अजूनही मोकाटचटोईंग वाहने अजूनही मोकाटच
- सीसीटीव्ही गायब, तरीही वाहने उचलण्याची कारवाई
पुणे – नो पार्किंगमधील वाहने उचलताना अनेकदा वाहनचालक आणि टोईंगवाले यांच्यामध्ये वाद होतात. या पार्श्वभूमीवर टोईंगच्या सर्व टेम्पोंमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सध्या सुरू असलेल्या धडाकेबाज कारवाईत वाहतूक पोलिसांना याचा विसर पडला आहे. सध्या सीसीटीव्हीविनाच कारवाई सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे हा वादाचा विषय होण्याची शक्यता आहे.
अनेकदा नो पार्किंगमध्ये नसलेले वाहनेही टोईंगावाले उचलतात. यात अनेकदा वाहन बिघडल्याचे आरोप केले जातात. काही वेळा टोईंग कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांवर दादागिरी केली जाते. तसेच अनेकदा अशा घटनांमध्ये वाहनचालकांचीही चूक असते. परंतु, पोलिसांना यासाठी जबाबदार धरले जाते. यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी टोईंग वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार शहरातील सर्व पाचही टेम्पोंवर सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. मात्र, मंगळवारी रास्ता पेठेत कारवाई सुरू असताना एका टोईंग टेम्पोवरील सीसीटीव्ही गायब असल्याचे दिसून आले.
काही महिन्यांपूर्वी विमाननगर परिसरातून एका वाहनचालकाला दुचाकीसह टेम्पोत टाकल्याचा प्रकार घडला. यानंतर सोशल मीडियावर हा प्रकार “व्हायरल’ झाल्याने सर्वस्तरातून वाहतूक पोलिसांवर टीका करण्यात आली. यानंतर काही दिवसांतच तत्कालिन वाहतूक उपायुक्त अशोक मोराळे यांनी टोईंग टेम्पोंवर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला होता.
मंगळवारी रास्ता पेठेमध्ये सीसीटीव्हीविना कारवाई होत असल्याचा प्रकार वाहतूक शाखेच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर संबंधित टेम्पो फरासाखाना हद्दीतील असल्याचे सांगण्यात आले. तसेच सीसीटीव्ही बसविलेला टेम्पो पासिंगसाठी गेला असून ठेकेदाराने तात्पुरता दुसरा टेम्पो उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे त्यावर सीसीटीव्ही कार्यान्वित नाही.
– विजय बाजारे, पोलीस निरीक्षक (प्रशासन), वाहतूक शाखा.
सध्या शहरात वाहतूक पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. यामुळे काही वेळा दुचाकीचालक आणि टोईंग टेम्पोतील कर्मचारी यांच्यात वाद होण्याची शक्यता असते. यामुळे टोईंग वाहनांवर सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही बसविलेलीच टेम्पो कारवाई करण्यासाठी वापरल्यास वाद होणार नाहीत.
– नीलेश ढेकळे, दुचाकीचालक