चार दिवस पावसाची शक्यता
मुंबई:- अरबी समुद्रात तयार झालेले महाचक्रीवादळ सध्या दीव किनाऱ्यापासून ५८० किलोमीटर आणि गुजरातमधील वेरावळपासून ५५० किलोमीटर अंतरावर असून, पुढील दोन दिवसांत त्याची तीव्रता वाढून अतितीव्र चक्रीवादळात त्याचे रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा पुढील प्रवास दीव आणि द्वारका किनाऱ्यापासून होणार आहे. त्यामुळे ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
‘क्यार’ चक्रीवादळाचा प्रवास ओमानच्या दिशेने होत असतानाच लक्षद्वीपजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावी क्षेत्राचे रूपांतर दोन दिवसांपूर्वी महाचक्रीवादळात झाले. या चक्रीवादळाचा प्रवास गुजरात किनाऱ्याच्या दिशेने होत असून ५ नोव्हेंबपर्यंत ते वळून त्याची तीव्रता कमी होऊन पूवरेत्तर प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या पाश्र्वभूमीवर उत्तर किनारपट्टी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार दिवस उत्तर किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ताशी १०० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्राला महाचक्रीवादळाचा थेट फटका बसणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले.
दरम्यान, उर्वरित किनारपट्टीवर आद्र्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे ५ आणि ६ नोव्हेंबर या काळात हवामान ढगाळ होण्याची शक्यता असून, किनारपट्टीवर पावसाची शक्यता वर्तवतण्यात आली आहे. तसेच मध्य महाष्ट्रात काही ठिकाणी या दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोमवारी राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह तुरळक पावसाच्या सरी कोसळतील.