चंद्रपुरात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे रास्ता रोको
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200528_191201.jpg)
चंद्रपूर : जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत उग्र आंदोलन केले. पावसाळा तोंडावर असताना कोरोना संकटामुळे विक्री करू न शकलेला कापूस शेतकरी सध्या खरेदी केंद्रांवर आणत आहेत. मात्र, सरकारच्या ढिसाळ नियोजनाने संतापात भर पडल्याने चंद्रपूर-आदीलाबाद महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरल्याने अडचणीची स्थिती उद्भवली होती.
जिल्ह्यातील बाजार समिती आणि सीसीआय मार्फत सुरू असलेली खरेदी केंद्रे शेतकऱ्यांच्या रोषाचे कारण ठरले आहे. याच संतापाचा उद्रेक जिल्ह्यातील कोरपना बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर बघायला मिळाला. हे खरेदी केंद्र मनमानी पद्धतीने चालवले जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी तेलंगणात जाणारा महामार्ग रोखून धरत संतापाला वाट करून दिली. शेतकऱ्यांना दिले गेलेले टोकन नियमानुसार घेतले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना कुठलीही माहिती न देता हे केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले.