घाटाखाली शिवसेनेवर नागरिकांचा संताप, तर राष्ट्रवादीकडून तरूणांच्या वाढल्या अपेक्षा
- भाजप कार्यकर्ते जाणार बारणेंच्या विरोधात
- राष्ट्रवादी पक्षाला आले सुगीचे दिवस
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – उरण, कर्जत आणि पनवेल विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कांग्रेस महाआघाडीचा जोरदार प्रचार सुरु आहे. उमेदवार पार्थ पवार यांच्या ताफ्यात हजारो तरुणांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सलग दोन वेळा मावळ लोकसभेचा गड राखून ठेवलेल्या शिवसेना खासदारांवर मतदारामध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. शिवसेनेचा खासदार निवडून दिल्यापासून ते एकदाही आमच्या गावाकडे फिरकले नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
तसेच शिवसेना-भाजप यांनी एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोपाचे घाव भाजप कार्यकर्त्यांनी विसरले नाहीत. त्याचा वचपा या निवडणुकीत काढणार असल्याची भावना भाजप कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. त्यामुळे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणेंना याचा फटका बसणार आहे.
मावळ लोकसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. शिवसेना, भाजप, आरपीआय (आठवले) महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार दौरा जोरात सुरू आहे. मात्र, म्हणावा तसा त्यांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शिवसैनिक नाराजी व्यक्त करत आहेत. राज्यातील सत्तेत सहभागी असताना महत्वाची पदे भाजपने स्वतःकडे ठेवून किरकोळ खात्याची पदे शिवसेनेच्या लोकांना दिली. त्यावरुन शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत राहिले.
एवढ्या खालच्या थऱातील आरोप झाल्यामुळे शिवसेना मंत्री राजीनामा देण्याच्या भूमिकेत होते. स्वतः उध्दव ठाकरे यांनी सुध्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडेतोड आरोप केले होते. त्यामुळे सत्तेत राहून आपल्याला पाडून बोलणा-या शिवसेनेविषयी भाजप निष्ठावंतांच्या मनामध्ये कटुता आहे. त्याचा वचपा या लोकसभा निवडणुकीत काढण्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. महाईन्यूजच्या प्रतिनिधिने कर्जत विधानसभा मतदान संघातील खालापूरच्या पट्ट्यात नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे. त्यावेळी काही नागरिकांनी शिवसेनेच्या उमेदवाराबाबत कटू भावना व्यक्त केली आहे.
वाशिवली, लोहप, टेंबरी, तुपगाव, वावर्ली, भिलवली, वावंडळ, कलोते या भागात शेतकरी कामगार पक्षाचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. तर, शिवसेनेचा मतदार मोजकाच दिसून आला. त्यातच भाजपच्या काही समर्थकांनी शिवसेनेच्या उमेदवाराबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दिली. आमच्यावर केलेले आरोप आम्ही कसे विसारायचे, अशी भावना देखील काहींनी व्यक्त केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून दिल्यानंतर बारणे आमच्या भागात फिरकलेच नाहीत, असेही काही नागरिक म्हणाले.