गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर अंत्यसंस्कार
मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुलाने मुखाग्नी दिला. गोव्यातील मिरामार बीच येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला.
केवळ गोव्यातच नव्हे तर देशातही आपल्या तत्त्वनिष्ठ आणि स्वच्छ राजकारणाची छाप उमटविणारया मनोहर पर्रीकर यांनी रविवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव पणजी येथील कला अकादमीत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी जनसागर लोटला होता.
कला अकादमीपासून सायंकाळी साडेचारच्या सुमारास पर्रीकर यांची अंत्ययात्रा निघाली. पर्रिकर यांचे समर्थक, भाजप कार्यकर्ते आणि हजारो नागरिक या अंत्ययात्रेत सहभागी झाले. ‘मनोहर भाई अमर रहे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सहा वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Panaji: Visuals from the last rites ceremony of late Goa Chief Minister #ManoharParrikar. pic.twitter.com/LrdsXHmRuB
— ANI (@ANI) March 18, 2019
पर्रीकर यांच्या निधनानंतर देशात दुखवटासदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनामुळे सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वीच पर्रीकरांच्या पत्नीचेही कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.