कोरोना संकटाचे भान ठेवून, आरोग्य जपत गणेशोत्सव साजरा करूया !
![Fee waiver for state liquor licenses; Decision due to Kovid situation- Chief Minister Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/uddhav-thackeray3-1591949499.jpg)
मुंबई | कोरोना विषाणूच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव कोविड-१९च्या आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा. यंदाचा उत्सव मर्यादित स्वरुपात साजरा होत असला, तरी पुढील वर्षी मात्र गेल्यावर्षीच्या उत्सवापेक्षा अधिक उत्साहात आणि भव्य-दिव्य असा साजरा करण्याचे प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२० जून) येथे केले.
मुंबई शहर जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने व्हिसीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये आमदार अजय चौधरी, मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्याच्या शासनाच्या प्रय़त्नांना सर्वतोपरी सहकार्य करू, अशी भूमिकाही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली. मुंबईतील गणेश मंडळांची समाजाभिमुख उपक्रमात योगदान देण्याची परंपरा आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात मंडळे आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्य मेळावे, शिबिरे आदी उपक्रमांद्वारे यावर्षीही हिरिरीने पुढे राहतील, असा विश्वास मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला, यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी गणेश मंडळांच्या या वैशिष्ट्यांचा पुनरूच्चार करतानाच, त्यांचे कौतुकही केले.