कोकणात खेळतात धाडसी होळी, एकमेकांच्या अंगावर फेकतात जळकी लाकडं
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-158.png)
रत्नागिरी | महाईन्यूज |
देसभरात आज गंगोत्सवाचा सण होळी सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. मात्र, महाराष्ट्रातील कोंकण भागात हा सण साजरा करताना अनेक प्रथा अजूनही रूढ आहेत. त्या आजही जशाच्या तशा कोंकणवासी पूर्ण करत असतात. कोकणात शिमगोत्सवाकडे श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग म्हणून पाहिले जाते. कोंकणात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत.
एकमेकाला जोरजोरात ‘फाका’ घालणे, होम पेटविणे, गोमुचा नाच, अशा अनेक गोष्टींसाठी शिमगा हा सण प्रसिद्ध आहे. मात्र, चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील प्रथा काही वेगळीच आणि अंगावर शहारे आणणारी आहे. होलटा शिमगा असे या प्रथेचं नाव आहे. ज्यांनी ही प्रथा पाहिली असेल, अशांचा ‘होलटे शिमग्या’ने अक्षरशः थरकाप उडतो. कारण यात चक्क पेटते निखारे एकमेकांवर मारले जातात.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/ab11150ccb2b70f84c274bf963e242c4.jpg)
रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे. मात्र शिमगोत्सवातील सावर्डे गावातील एक जीवघेणी प्रथा-परंपरा अनेकांचा थरकाप उडवते. ‘होलटे शिमगे’ असे त्या परंपरेचे नाव आहे. यात पेटती लाकडे एकमेकांवर फेकून मारण्यात येतात. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे ‘होलटे होम’ हा खेळ खेळला जातो.
या खेळात मानपानाप्रमाणे गावातील दोन गट परस्परांसमोर उभे राहून लाकडे पेटवतात. नंतर ढोल-ताशांच्या गजरात आरोळ्या ठोकत सुमारे तीस फुटाच्या अंतरावरुन ती पेटती लाकडे (होलटे) पाच वेळा एकमेकांवर फेकतात. मात्र ही जळती लाकडे अंगावर पडून कोणीही जखमी किंवा भाजत नाही. शेवटी उरलेली लाकडे एकत्र करुन त्यांची होळी केली जाते.
या होलटे होम होळीचे काही नियम आहेत. दोन गट एक मेकांसमोर उभे राहतात. लहान मोठे यांच्या हातात जळका होलटा म्हणजे लाकूड असतं. प्रत्येक वाडीतली मुलं या खेळात सहभागी होतात. ढोल-ताशा आणि सनईच्या वादनात होलटे खेळणाऱ्या खेळाडूंच स्वागत होतं. पायात चप्पल न घालता एकमेकांवर हे होलटे फेकले जातात. वाईट इच्छा किंवा मद्यपान केलेल्या व्यक्तीच्याच माथी हे पेटते लाकूड पडते आणि त्याला शिक्षा मिळते, असा या प्रथेतील समज आहे. त्यामुळे अनेक चाकरमानीसुद्धा हा खेळ खेळण्यासाठी येतात.
पाच वेळा एकमेकांवर हे पेटते निखारे फेकले जातात. एका वेळी एका बाजूने एकच गट हे पेटते निखारे फेकतो. या ‘होलटे शिमग्याचे’ वैशिष्ट्ये म्हणजे पेटती लाकडे एकमेकांवर मारुनही कोणीही जखमी होत नाही. त्यामुळे अगदी चाकरमानी सुद्धा ही धाडसी होळी खेळतात.