केवळ 25 टक्के दृष्टी, क्लास न करता बीडच्या तरुणाची यूपीएससी बाजी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/app_aurangabad_060450_img.jpg)
पुणे – केंद्रीय लाेकसेवा अायाेग परीक्षेचा (यूपीएससी) निकाल शुक्रवारी रात्री जाहिर झाला अाणि यशस्वी उमेदवारांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन सुरू झाले. मात्र, घरची अार्थिक परिस्थिती बेताचीच, क्लास करण्यासाठी पैसे नाहीत अाणि अभ्यास करण्यासाठी केवळ २५ टक्केच दृष्टी असताना बीडच्या जयंत मंकले या तरुणाने जिद्द अाणि चिकाटीच्या अाधारावर अपंगत्वावर मात यूपीएससीच्या परीक्षेत ९२३ वी रँक मिळवत बाजी मारली अाहे.
जयंत मंकले याने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले की, बीड येथील एका गरीब कुटुंबातील मी सर्वसामान्य मुलगा असून माझे वडील किशाेर मंकले हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये चतृर्थ श्रेणीची कर्मचारी म्हणून काम करत हाेते. सन २००३ मध्ये त्यांचे निधन झाले अाणि अामच्या कुटुंबावर दुख:चा डाेंगर काेसळला. दाेन माेठ्या बहिणी व गृहिणी असलेली अार्इ छाया यांच्यासाेबत मी राहत हाेताे. वडिलांचे निधन झाल्यानंतर सुमारे दीड वर्ष पेन्शन मिळत नसल्याने माेठा संघर्ष करावा लागला. अखेर सात हजार रुपयांची पेन्शन अाम्हाला सुरू झाली. एसबीअाय बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेऊन संगमनेर येथील अमृतवाहिनी काॅलेजमधून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतले. बँकेचे हप्ते अद्याप सुरू असून सुरुवातीला दाेन वर्ष तळेगाव व भाेसरी एमअायडीसी येथे खासगी कंपनीत नाेकरी केली. ताेपर्यंत मला चांगल्याप्रकारे दृष्टी हाेती. मात्र, २०१४ पासून हळूहळू मला अंधुक दिसू लागले. तपासणी केल्यानंतर डाॅक्टरांनी मला ‘रेटिना पिंगमेंटाेसा’ हा अाजार असल्याचे सांगितले. त्यामुळे यापुढे नेमके करायचे काय हा माेठा प्रश्न माझ्यासमाेर होता.
अंधांना सरकारी नाेकरीची हमी म्हणून यूपीएससी
जयंत म्हणाला, सन २०१४ पासून दृष्टी हळूहळू कमी हाेत गेल्याने खासगी नाेकरी करणे अडचणीचे हाेऊ लागले अाणि ७५ टक्के अांधळेपणा अाला. त्यामुळे सरकार अापले मायबाप हे डाेळयासमाेर ध्येय ठेवून सरकारी नाेकरीत अंध व्यक्तींना नाेकरीची हमी असल्याचे माहिती झाल्याने यूपीएससी करण्याचे ठरवले. मात्र, कठीण परीक्षा असल्याने कठाेर मेहनत घ्यावी लागेल हे मनाशी ठरवले. वडगाव धायरी येथे मामाने राहण्यासाठी घर उपलब्ध करून दिल्याने राहण्याचा मार्ग माेकळा झाला. मात्र, क्लास करण्यासाठी तसेच अधिक पुस्तके खरेदी करण्यास पैसे नसल्याने घरीच अभ्यास सुरू करत स्वअध्यायानावर भर दिला. युनिक अॅकॅडमीचे मनाेहर भाेळे व प्रवीण चव्हाण सर यांना भेटल्यानंतर त्यांनी वैयक्तिक मार्गदर्शन करण्याचे अाश्वासन दिले. त्यानुसार अाठवड्यातून एकदा त्यांना भेटून सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊ लागलाे. दृष्टीहीनतेमुळे वाचन करण्यासाठी अडचण येत असल्याने माेबार्इलवर स्कॅन रीडर अॅप डाऊनलाेड करून त्याअाधारे पुस्तकातील पानांचे फाेटाे घेऊन, ते स्क्रीनवर झूम करून वाचन करत हाेताे. जास्त पुस्तके वाचणे शक्य नसल्याने कमी पुस्तके अधिक वेळा चांगले वाचन यावर भर दिला. दरराेज ११ ते १२ तास अभ्यास करण्याचे नियाेजन केले अाणि मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषयासाठी राज्यशास्त्र विषयाची निवड केली.
मराठी माध्यमात परीक्षा देऊन मिळवले यश
इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषेवर माझे प्रभुत्व असल्याने तसेच इतर अवांतर पुस्तके वाचन करण्याची अावड असल्याने मराठी भाषेत परीक्षा देण्याचे निश्चित केल्याचे जयंत म्हणाला. वाचनापेक्षा एेकण्यावर अधिक भर मी दिला. दृष्टीहीनतेच्या अडचणीमुळे युपीएस्सीच्या पहिल्या दाेन प्रयत्नात मी प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालो नाही. तिसऱ्या प्रयत्नावेळी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने मदत झाली. चाैथ्या प्रयत्नात मला यश मिळवले. मुलाखतीदरम्यान शेतकरी अात्महत्या आणि इतर प्रश्न विचारण्यात आले.