कॅन्टोन्मेंटच्या समस्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/pune-contoment-board-696x435.jpg)
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन : देशपातळीवरील संघटनेने घेतली भेट
पुणे – देशभरात कॅन्टोन्मेंट हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत संरक्षण मंत्रालय जागरूक असून लवकरच यासाठी लोकहितकारक निर्णय मंत्रालयाकडून घेण्यात येतील. विशेषत: परिसरातील बंगला धारकांच्या समस्या अथवा भाडेतत्त्वावर दिलेल्या जुन्या मालमत्तांच्या भाडेकरार नूतनीकरणास मुदतवाढीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असा विश्वास संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.
ऑल कॅन्टोन्मेंट सिटिझन वेलफेअर असोसिएशन या देशपातळीवरील संस्थेच्या शिष्टमंडळाने नुकतीच सीतारामन यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष विजय पंडित, सहसचिव जितेंदर सुराणा, एस.एम.झाकी, संदीप जैन आणि मेजर जनरल टी.के.चड्डा यांचा समावेश होता. यावेळी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील भाडेतत्त्वावर दिलेल्या जुन्या मालमत्तांच्या भाडेकरार नूतनीकरणास मुदतवाढ तसेच कॅन्टोन्मेंट परिसरातील बंगलाधारकांच्या समस्यांवर तोडग्यासाठी एकत्रित धोरण आणले जात असल्याचे आश्वासन सीतारामन यांनी दिले. तसेच, स्थानिक लष्करी प्रशासनाने बंद केलेले रस्ते खुले करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत मंत्रालय आग्रही असून, यासंदर्भात नागरिकांना काही अडचणी असल्यास त्यांनी थेट मंत्रालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.