काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकसभेतील आठ जागांचा तिढा कायम – शरद पवार
कोल्हापूर – काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या ४८ जागांचा विषय चर्चा सुरु होती. त्यातील ४० जागांचा विषय संपला असून ८ जागांचा तिढा कायम आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते आज (रविवारी) कोल्हापूरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, प्रत्यक्षात तीन ठिकाणी अडचणी येत आहेत. पण त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीपैकी कोणाचा उमेदवार सक्षम आहे, हे तपासले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रभावी उमेदवार दिले जाणार आहेत. येत्या ८ दिवसांत हा प्रश्न सुटेल. त्यानंतर राज्यात प्रमुख शहरांत उभय काँग्रेसच्या संयुक्त प्रचार सभांना सुरूवात करणार आहे.
यावेळी पवार यांनी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयीही भाष्य केले. ते म्हणाले, डी वाय पाटील हे मला राष्ट्रवादीचे सभासद करण्याविषयी आग्रह धरत होते. ते माझे हितचिंतक आहेत. गरज पडल्यास ते मार्गदर्शन सुद्धा करतील. सक्रिय नसले तरी या गुणांमुळे ते आम्हाला महत्वाचे आहेत, असा खुलासा त्यांनी केला.