कानशिलात लगावल्याचा जाब विचारल्याने डिलक्स चौकात संगणक अभियंत्याचा खून
![Massacre in Gondia! The accused killed himself by killing three](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/murder-1_201707279.jpg)
पिंपरी (महा-ई-न्यूज) – कानशिलात लगावल्याचा जाब विचारला म्हणून पिंपरीत एका संगणक अभियंत्याचा धारदार शस्त्रांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंजित प्रसाद असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पुण्यातील आयटी पार्कमध्ये डब्लूएनएस कंपनीत काम करत होता. शुक्रवारी मध्यरात्री पिंपरीच्या डीलक्स चौकात त्याच्यावर वार करण्यात आले. वार वर्मी लागल्याने त्याचा उपचारादरम्यान काही तासांनी मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
धर्मेश शामकांत पाटील, यशवंत उर्फ अनिल लक्ष्मण गायकवाड (वय 20, दोघे रा. गोकुळधाम हौसंग सोसायटी नंबर क्रमशा 306, 204) आणि स्वप्निल संजय कांबळे (वय 25, रा. आदर्शनगर, मोनिका अपार्टमेंटजवळ पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे अन्य साथीदार फरार आहेत. याप्रकरणी मोहन संभाजी देवकते (वय 25, रा. खराडी रोड, चंदननगर) यांनी पिंपरी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजित प्रसाद हे विमाननगर येथील आयटीपार्क मध्ये संगणक अभियंता म्हणून काम करतात. नेहमी प्रमाणे ते कॅब (बस) ने काळेवाडीच्या दिशेने जात होते. बसमध्ये अनेक ऍम्प्लॉईज होते. पिंपरीच्या डीलक्स चौकात काही अज्ञात गुंडांनी रस्ता अडवला त्यांनी बस थांबविण्यास बस चालकाला सांगितले. बस चालकाशेजारी मंजित बसले होते. त्यांनी काय झाले असे गुंडांना विचारले असता त्यातील एका आरोपीने त्यांच्या कानाखाली मारली. याचाच जाब विचारण्यासाठी मंजित बसच्या खाली उतरले. तेव्हा मंजित यांना पाच जणांनी लथाबुक्यांनी मारायला सुरुवात केली. त्यातील काहींनी धारदार शस्त्रांनी पोटावर आणि छातीवर वार केले. यात मंजित गंभीर जखमी झाले.
सर्व कर्मचारी एकत्र गुंडांच्या दिशेने धावल्याने गुंड पळून गेले. मंजित यांना गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान काही तासांनी मृत्यू झाला आहे. या घटने प्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.