कांदा निर्यातीच्या बंदीवर उदयनराजे भोसले यांनी देखील दर्शवला विरोध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Onion-Export-Ban-Udayanraje-Bhosale-696x386-1.jpg)
कांदा निर्यातीवर बंदी लादण्याच्या मोदी सरकारच्या अनपेक्षित निर्णयाचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. शेतकरी संघटनांसह विरोधकांनी या निर्णयाविरोधात आंदोलनाची हाक दिली असताना आता भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील याबाबत विरोध दर्शवला आहे. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिलं असून हा निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असल्याचं म्हटलं आहे.
‘केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा करोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्याना उद्ध्वस्त करणारी आहे. केंद्र सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्याना दिलासा द्यावा,’ अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.
‘कांदा उत्पादक शेतकरी हा गरीब आहे. कोरोना काळात संपूर्ण देशाला सावरण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे. देशाला अन्नधान्य व भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. आज जगभर कांद्याला मोठी मागणी आहे. अशा वेळी निर्यातबंदीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. जेव्हा भाव कोसळतात तेव्हा कांदा फेकून द्यावा लागतो. आज चांगला भाव मिळत असताना निर्यातबंदीचा निर्णय घेणे चुकीचं आहे,’ हे उदयनराजे यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.
‘लॉकडाऊनच्या संकटातून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार आता कुठे सावरत असताना ही अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल. त्यामुळं सहानुभूतीपूर्वक विचार करून कांद्यावरची निर्यातबंदी उठवून शेतकरी, व्यापारी व वाहतूकदारांना दिलासा द्यावा,’ अशी मागणी उदयनराजे यांनी पत्राद्वारे केली आहे. ‘महाराष्ट्रातील नाशिक ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापाऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कांद्यावर अवलंबून आहे. त्यामुळं सरकारनं व्यापक हित लक्षात घ्यावं. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळं भारताच्या निर्यात धोरणाला जागतिक स्तरावर फटका बसू शकतो याचा विचार व्हावा,’ अशी अपेक्षा उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.