breaking-newsमहाराष्ट्र

काँग्रेस मोदी सरकारविरोधात करणार आंदोलन – बाळासाहेब थोरात

मुंबई : भारत-चीन वाद आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यामुळे काँग्रेस मोदी सरकार विरोधात आंदोलन करणार आहे. याबाबत माहिती देताना काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. चीनने २० भारतीय जवानांना हालहाल करुन मारले तरीही मोदी सरकार गप्पच आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे. चीनबाबतचे कुचकामी धोरण व अन्यायी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारला जाब विचारणार आहे.’

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला तसेच चीनी सैन्याने सीमा ओलांडली नाही अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केला आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे.

भारताच्या २० वीर शहीद जवानांप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी २६ जूनला ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळला जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा, शहीद स्मारक किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकासमोर एकत्र येऊन मेणबत्या पेटवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेने हे आंदोलन केले जाणार आहे. तसेच याच दिवशी #SpeakupForOurMartyrs  ही ऑनलाईन मोहीमही सोशल मीडियावर चालवली जाणार आहे.

इंधन दरवाधीविरोधात २९ जूनला आंदोलन

‘आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही उलट सलग १९ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढच केली जात आहे.

कोरोनामुळे जगणे मुश्कील झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी २९ जूनला केंद्र सरकारच्या विरोधात सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी १० ते १२ या वेळत दोन तास धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम करताना सोशल डिस्टन्स ठेवून तसेच मास्क लावूनच करावेत याच्या सुचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. याच दिवशी #SpeakuponPetroleumPrices  ही ऑनलाईन मोहिम सोशल मीडियावर चालवली जाणार आहे,’ असे थोरात म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button