काँग्रेस नेत्याच्या पोस्टरवर राहुल गांधी ‘श्री रामा’च्या आवतारात !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/rahul-gandhi.jpg)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावे अवतार असल्याचे ट्विट भाजपा नेते अवधूत वाघ यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर अनेकांनी टीकेची झोड उडवली होती. यानंतर काँग्रेसच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या पोस्टरवर प्रभू रामचंद्रांच्या रूपात दाखवले आहे. ‘वे राम नाम जपते रहे, तुम बनकर राम जियो रे’ असा मजकूर असलेले पोस्टर बिहारमध्ये लावण्यात आले आहे.
या पोस्टरच्या माध्यमातून भाजपला राम मंदिरावरून टीका केली असल्याची चर्चा रंगली आहे. पटणा येथे ३ फेब्रुवारीला गांधी मैदानमध्ये काँग्रेसतर्फे ‘जन आकांक्षा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅली संदर्भात लावण्यात आलेले पोस्टर वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय बनले आहे. पोस्टरमध्ये संसद भवन दाखवले असून राहुल गांधी प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपात दाखवले आहेत. सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे फोटोही पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहेत. विरोधक यावर काय प्रतिक्रीया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘भारताचे पंतप्रधान परम आदरणीय नरेंद्र मोदी जी हे श्री विष्णूचे अकरावे अवतार आहेत’, असे भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. अवधूत वाघ यांच्या विधानाला फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.