कर्नाटक सरकारची मस्ती अजिबात चालू देणार नाही,बेळगावसह सीमा भाग आणारच -उद्धव ठाकरे
![Karnataka government's fun will not continue at all, the border with Belgaum will be brought - Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/cm.jpg)
मुंबई – कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ‘ महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प’ पुस्तकाचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले कि, मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडले पाहिजे. हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही महाराष्ट्रातच आहात. कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल टाकत आहे. एखादे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर काही करायचे नसते, तो न्यायालयाचा अपमान ठरतो. पण तरीही बेळगावचे नामांतर करण्यात आले. त्याला उपराजधानी केली गेली. विधीमंडळाचे अधिवेशन केले जाते. हा न्यायालयाचा अपमान नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
आपण ज्याप्रकारे कायद्याचा विचार करतो तसे कर्नाटक सरकार करत नाही. हा विषय केवळ तेवढ्यापुरता बोलण्याचा नाही. कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो, कोणीही मुख्यमंत्री असो. मराठी लोकांवर अत्याचार करायचा यावर त्यांचे दुमत नसते. त्याचप्रमाणे हा भूभाग जो कर्नाटकव्याप्त आहे तो माझ्या राज्यात आणणारच असे एकत्रितपणे लढलो तर हा प्रश्न सुटेल, असा विश्वासहीउद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
माझ्याकडे अनेकजण आमच्यासाठी तिथे मराठी शाळा सुरु करण्याची मागणी करतात. हरत नाही.एकदा आल्यानंतर तुम्ही आमचेच आहात. कर्नाटकनेही कधी केलं नसेल एवढं मोठं काम तुमच्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही. नावाप्रमाणेच ते ‘बेलगाम’ वागत आहेत. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्या सरकारने हा भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी न्यायालयात केली पाहिजे. कर्नाटक सरकारची मस्ती अजिबात चालू देणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हंटले आहे.