breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कमला मिल अग्नितांडवप्रकरण : तिघे बडतर्फ, तिघांची पदावनती

चौकशी समितीची शिफारस, पाच जणांची वेतनवाढ रोखणार

कमला मिल अग्नितांडवप्रकरणी ठपका ठेवलेल्या ११ अधिकाऱ्यांपैकी तिघांना महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ, तर तिघांची पदावनती करण्याची आणि उर्वरित पाच जणांच्या दोन ते सहा वेतनवाढी रोखण्याची शिफारस चौकशी समितीने अहवालात केली असल्याचे समजते.

चौकशी समितीने आयुक्तांकडे अहवाल सादर केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी तो चौकशी खात्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या तिघांवर नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे समजते.

या प्रकरणी पालिकेच्या जी-दक्षिण विभागातील इमारत आणि कारखाने विभागातील पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, दुय्यम अभियंता दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे, साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच जी-दक्षिण विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची तात्काळ बदली करण्यात आली. तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. सिंघल यांनी ११ अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याचा अहवाल अलीकडेच पालिका आयुक्तांकडे सादर केल्याचे समजते. लोकसभा निवडणुकांचा निकाल २३ मे रोजी जाहीर होत असल्याने कमला मिल चौकशी अहवालाबाबत पालिका अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.

कमला मिल अग्नितांडवप्रकरणीच्या अंतिम अहवालात ११पैकी तिघांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणात सुरुवातीला निलंबित करण्यात आलेल्या पाच जणांपैकी तिघांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचे समजते. त्याचबरोबर तिघांची पदावनती करण्यात येणार आहे. उर्वरित पाच जणांच्या दोन ते सहा वेतनवाढी रोखण्याची शिफारस अहवालात करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

लोअर परळ परिसरातील कमला मिल कम्पाऊंडमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्रो’ या दोन ‘रेस्टोपब’ना २९ डिसेंबर २०१७ रोजी  भीषण आग लागली. आगीमध्ये १४ जणांचा मृत्यू आणि ५५ जण जखमी झाले होते. ‘रेस्टोपब’मध्ये करण्यात आलेले बेकायदा बांधकाम, अंतर्गत फेरबदल आदी या दुर्घटनेला कारणीभूत ठरले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button