एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट
![एसटी कर्मचाऱ्यांची कोंडी; ६२३ जणांच्या बदल्या; कारवाईसाठी आगारनिहाय यादी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/st-bus-Frame-copy-2.jpg)
महाईन्यूज | पुणे
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट असून ती सुधारण्यासाठी, खर्चात कपात व उत्पन्नवाढीसाठी एक आढावा बैठक एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून घेण्यात येणार आहे. पुण्यात २३ डिसेंबरला होणाऱ्या या बैठकीचे पत्रक काढताना आर्थिक स्थिती बिकट असल्याची कबुलीच एसटी महामंडळानेच दिलेली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व विभाग नियंत्रक, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, उपमहाव्यवस्थापक (प्रशिक्षण) यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
एसटी महामंडळाला होणारा नफा व तोटा, भारमान, उत्पन्नवाढीसाठी केलेल्या उपाययोजना व उत्पन्न घसरणीची कारणमीमांसा, खर्चात कपात करण्यासाठी उपाय, प्रवाशांनी केलेल्या विविध प्रकारच्या तक्रारी, वातानुकूलित आणि विनावाहक सेवांचा आढावा बैठकीत घेण्यात येणार आहे. एसटी महामंडळाचे २५० पैकी १८० आगार तोटय़ात आहेत. गेल्या दोन महिन्यात आगारातील कर्मचाऱ्यांचे वेतन अंशत: दिले जात आहे. त्यातच गेल्या वर्षी एसटीचा ४ हजार ५४९ कोटी रुपये असलेला संचित तोटा पाच हजार कोटींपर्यंत वाढण्याची भीतीही महामंडळाकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.