एसटी बस सेवा सशुल्क की मोफत यावरून गोंधळ,अखेर एसटी बस सेवाच रद्द
एसटी बस सेवेसाठी शुल्क द्यायचा की मोफत यावरून गोंधळ सुरू आहे. त्यामुळं सोमवारपासून सुरू होणारी मोफत सेवा स्थगित करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचंही म्हटलं जात.मात्र यावरून सध्या प्रशासकीय पातळीवर आदेशाचे गोंधळ कायम असल्याचे दिसून येते.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारपासून मजूर, विद्यार्थी, भाविक आणि अडकलेल्या लोकांसाठी प्रवास सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. ही सेवा काही कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून येत्या काही दिवसांत सेवेबाबत निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.
दरम्यान, एसटीची कोणतीही सोय सुरू नाही, असं सांगण्यात येत आहे. मुंबईतील बोरिवली येथील नेन्सी कॉलनी आगारात आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळं एसटी कर्मचारी आणि गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रवाशांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडत आहेत.एसटीची मोफत सेवा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता हा निर्णय सध्यातरी मागे घेण्यात आला आहे.