‘एलएसडी स्टॅम्प’चा महाविद्यालयीन युवकांना विळखा

पुणे | महाईन्यूज
महाविद्यालयीन युवक तसेच उच्चभ्रू समाजातील व्यक्तींना जाळ्यात ओढून शहरात सर्रास अमली पदार्थाची विक्री केली जात आहे. गेल्या वर्षभरापासून एलएसडी स्टॅम्प या अमली पदार्थाचा वापर वाढीस लागला आहे. टपाल तिकिटा प्रमाणे दिसणाऱ्या एलएसडी स्टॅम्प या अमली पदार्थाच्या विळख्यात शहरातील अनेक जण सापडले आहेत.
ब्राऊन शुगर, कोकेन, चरस, गांजा अशा अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांनी शहरात त्यांचे जाळे निर्माण केले असून गेल्या वर्षभरापासून एलएसडी स्टॅम्प नावाचा अमली पदार्थ छुप्या पद्धतीने देशात विक्रीसाठी आणला जात आहे. उच्चभ्रूंच्या पाटर्य़ामध्ये एलएसडी स्टॅम्पचा वापर वाढला आहे. महाविद्यालयीन युवकदेखील या नशेच्या आहारी गेल्याची माहिती देण्यात आली. अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांकडून एलएसडीला (लायसेरजिक अॅसीड डायथेलामाईड) ‘अॅसिड’ असे टोपण नाव देण्यात आले आहे.
एलएसडी द्रवस्वरुपात, गोळ्या तसेच टपाल तिकिटाप्रमाणे भासणाऱ्या कागदावर चिटकवून विकण्यात येते. पुणे, मुंबईसह देशातील प्रमुख महानगरात महाविद्यालयीन युवक तसेच उच्चभ्रूंच्या पाटर्य़ामध्ये एलएसडी स्टॅम्पचा वापर वाढला आहे, असे निरीक्षण सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त (अमलीपदार्थ विरोधी विभाग) वैशाली पतंगे यांनी नोंदविले.
गेल्या वर्षभरात सीमाशुल्क विभागाच्या पुणे विभागाकडून तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अमली पदार्थ विक्रेत्यांकडून ६४१ एलएसडी स्टॅम्प जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एलएसडी स्टॅम्पची किंमत ३१ लाख रुपये आहे. कस्टमच्या पुणे विभागाने गेल्या आठवडय़ात कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर एका महिलेला एलएसडी स्टॅम्पच्या विक्री प्रकरणात अटक केली होती. त्या महिलेकडून ४१६ एलएसडी स्टॅम्प जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या स्टॅम्पची किंमत २० लाख रुपये असल्याचे पतंगे यांनी सांगितले.




