… एकदा माझी सटकली तर तुझे काही खरे नाही – अजित पवार
कर्जत – राज्यातला आदर्श मतदारसंघ निर्माण करण्याचे स्वप्न रोहितचे आहे. ते पूर्ण करण्यासाठी विकास आघाडी सरकार पाठीमागे खंबीर उभे आहे. त्यामुळे अधिकारी चिरीमिरी घेत असतील तर नाव सांगा, बघतो त्यांच्याकडे.. एका सर्कलची तक्रार आली होती, तेव्हा मी त्याला सांगेल नीट काम कर, एकदा माझी सटकली तर तुझे काही खरे नाही. रस्ता खराब झाला तर त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकू, असा इशाराही त्यांनी दिला.
माहिजळगाव येथे आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून सृजन महाराजस्व अभियानात कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील 36 गावांतील 42 हजार लाभार्थींना विविध योजनांचा लाभ प्रमाणपत्र वाटपप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. सुधीर तांबे व लहू कानडे, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तुमच्याकडे पालकमंत्रिपद होतं मात्र त्याचा पाहिजे तेवढा फायदा झाला नाही. आता मात्र राज्यातला आदर्श मतदारसंघ निर्माण करण्याचे स्वप्न रोहितचे आहे. ते पूर्ण करण्यासाठी विकास आघाडी सरकार पाठीमागे खंबीर उभे राहू मात्र याकरिता आपल्या सर्वांचे सहकार्य आणि साथ लागेल. तो सारखा म्हणत असतो, काका हे करा, काका ते करा. तुम्हीपण सगळं विसरून कामाला लागलं पाहिजे., असेही ते म्हणाले.